
मुंबई (संपादक सुनिल पाटील) | विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील शैक्षणिक वाटचालीसाठी योग्य दिशा मिळावी, विविध क्षेत्रांतील करिअरच्या नव्या संधींची माहिती व्हावी तसेच उच्च शिक्षणाबाबत योग्य निर्णय घेता यावेत, या उद्देशाने ऐरोली येथे भव्य ‘करिअर कौन्सेलिंग’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गजानन चॅरिटेबल संस्थेच्या राजमाता जिजाऊ पदवी महाविद्यालय आणि मदर तेरेसा कॉन्व्हेंट स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, ऐरोली यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. २१ नोव्हेंबर २०२६ रोजी हा उपक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमाला गजानन चॅरिटेबल संस्थेचे सचिव डॉ. व्ही. टी. पाटील, प्रमुख मार्गदर्शक व रेडियंट अकॅडमीचे संस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रत्नाकर अहिरे, तुर्भे येथील लुब्रिझोल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे सेवानिवृत्त असिस्टंट जनरल मॅनेजर मनोहर पाटील आणि वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच, कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करण्यासाठी धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या उपजिल्हाधिकारी श्रीमती वृषाली पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली. यावेळी मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. रत्नाकर अहिरे यांनी उपस्थितांना विविध क्षेत्रांतील करिअरच्या संधी, उच्च शिक्षणाचे पर्याय आणि भविष्यातील करिअर निवडीसंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी केवळ इतरांचे अनुकरण न करता आपल्या अंगभूत आवडी, क्षमता आणि कौशल्यांचा विचार करून करिअरची दिशा निश्चित करावी.”
तीन स्वतंत्र सत्रांमध्ये नियोजन या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन तीन स्वतंत्र सत्रांमध्ये करण्यात आले होते. यात पहिले सत्र: इयत्ता अकरावीचे विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी मार्गदर्शन करण्यात आले. दुसरे सत्र: इयत्ता बारावीचे विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी या सत्राचा लाभ घेतला. तिसरे सत्र: महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी विशेष मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
या स्तुत्य उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी नवी दिशा मिळाली असून, कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक व शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.







