सौ. माया हेमंत भाटकर यांच्या पत्रलेखनाला राष्ट्रीय स्तरावरील ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ची मान्यता; गेली २७ वर्षे ६१३६ पत्र लिहून समाजप्रबोधन

सौ. माया हेमंत भाटकर

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) | आपल्या निर्भय आणि निष्पक्ष लेखणीच्या माध्यमातून गेली सलग २७ वर्षे सामाजिक प्रश्न, शैक्षणिक सुधारणा, वित्तीय धोरण, सायबर सुरक्षा, लोकप्रतिनिधींची जबाबदारी, कौटुंबिक सुसंवाद आणि स्त्रियांवरील अत्याचार यांसारख्या अनेक ज्वलंत विषयांवर तब्बल ६१३६ वाचकपत्रे लिहून समाजप्रबोधन करणाऱ्या सौ. माया हेमंत भाटकर यांच्या अतुलनीय कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. त्यांच्या या विक्रमी पत्रलेखनाची नोंद घेत ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने (India Book of Records) त्यास अधिकृतरीत्या प्रमाणित केले आहे. विशेष म्हणजे, मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा विविध दैनिकांमधून त्यांच्या या पत्रांना सातत्याने प्रसिद्धी लाभली आहे.

विविध संस्थात्मक आणि सामाजिक जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत असतानाही पत्रलेखनाचा अखंड वसा त्यांनी जोपासला आहे. ‘पत्रलेखन हेच माझे ईकेगाई म्हणजेच जीवनध्येय आहे,’ असे त्या मानतात आणि हा वसा भविष्यातही असाच अखंडपणे चालू ठेवण्याचा त्यांचा दृढ निर्धार आहे. या पत्रांच्या माध्यमातून त्यांनी नेहमीच महिलांचे प्रश्न, त्यांचे हक्क, सामाजिक अनिष्ट प्रथा आणि सर्वसामान्यांच्या समस्यांवर अत्यंत रोखठोक भाष्य केले आहे.

केवळ लेखनच नव्हे, तर शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातही सौ. माया भाटकर यांनी आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या सिनेट व मॅनेजमेंट कौन्सिल सदस्य ही महत्त्वाची पदे भूषवली आहेत. तसेच, ग्रामीण भागात अनेक विकास प्रकल्पांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असून, सध्या त्या ‘जनकल्याण सहकारी बँके’च्या संचालक मंडळावर संचालक म्हणून अत्यंत जबाबदारीने कार्यरत आहेत. त्यांच्या या राष्ट्रीय पातळीवरील यशाबद्दल विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here