शिर्डी साईबाबा संस्थानच्या कामगारांना बँक ऑफ बडोदामार्फत सॅलरी अकाउंटच्या अपघाती विम्यात घसघसटीत वाढ

शिर्डी साईबाबा संस्थान

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) | श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी येथील कायम व कंत्राटी कामगारांसाठी बँक ऑफ बडोदा शाखा शिर्डीतर्फे अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण वृत्त समोर आले आहे. संस्थानच्या कामगारांच्या सॅलरी अकाउंट (पगारस्लीप खाते) योजनेअंतर्गत विमा रकमेत भरघोस वाढ करण्यात आली असून, पूर्वी मिळणारा ४० लाखांचा अपघाती विमा आता थेट ८० लाख रुपये करण्यात आला आहे.

या योजनेत ज्या कामगारांचे मासिक वेतन ५०,००० रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना या योजनेअंतर्गत तब्बल १ कोटी रुपयांपर्यंतचे अपघाती विमा कवच मिळणार आहे. नैसर्गिक मृत्यू झाल्यास ५०,००० रुपयांपेक्षा कमी पगार असणाऱ्या कामगारांच्या कुटुंबीयांना २ लाख रुपये, तर ५०,००० पेक्षा जास्त पगार असणाऱ्यांना ५ लाख रुपयांपर्यंतचे विमा कवच मिळेल. तसेच ऑन ड्युटी अपघाती मृत्यू झाल्यास मूळ विम्याव्यतिरिक्त २५% अधिक रक्कम (जास्तीत जास्त २५ लाख रुपयांपर्यंतचा अतिरिक्त क्लेम) मंजूर करण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी १०% अपघाती विमा कवचाची अतिरिक्त रक्कम (जास्तीत जास्त १० लाख रुपये) आणि उच्च शिक्षणासाठी १०% (अतिरिक्त १० लाख रुपये) कवच मिळणार आहे. याशिवाय, अपंगत्व आल्यास विम्याच्या ७५% इतकी रक्कम मिळण्याची तरतूद आहे.

हा लाभ मिळवण्यासाठी कामगारांचे बँक ऑफ बडोदामध्ये पगार बचत खाते असणे आवश्यक आहे. ही सुधारित योजना शिर्डी संस्थानच्या कामगारांना लागू करण्यासाठी बँक ऑफ बडोदाच्या छत्रपती संभाजीनगर क्षेत्रीय कार्यालयाचे वरिष्ठ प्रबंधक सागर आरगडे, वरिष्ठ प्रबंधक तुषार लांडे, शिर्डी शाखा प्रबंधक संदीप भागवत, पवन जगताप तसेच शिर्डी शाखेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. तरी शिर्डी साईबाबा संस्थानमधील जास्तीत जास्त कायम व कंत्राटी कामगारांनी बँक ऑफ बडोदाच्या शिर्डी शाखा व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधून या सॅलरी अकाउंट योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here