पिकअप अडवून लुटमार करणाऱ्या टोळीचा १२ तासांत पर्दाफाश; खुद्द फिर्यादीच निघाला मुख्य सूत्रधार

पिकअप

पारनेर पोलिसांची धडक कारवाई; १३ लाख ६१ हजारांच्या मुद्देमालासह तिघांना बेड्या

अहिल्यानगर (जिल्हा क्राइम रिपोर्टर संजय शिंदे ) | मांडवे घाटात पिकअप वाहन अडवून कोयत्याचा धाक दाखवत कोंबड्यांच्या विक्रीचे रोख पैसे लुटल्याचा बनाव रचणाऱ्या फिर्यादीचाच खरा चेहरा पारनेर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत समोर आणला आहे. या लुटमारीचा कट स्वतः फिर्यादीनेच रचल्याचे तपासात उघड झाले असून, पोलिसांनी फिर्यादीसह तिघांना गजाआड केले आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कार, रोख रक्कम व मोबाईल असा एकूण १३ लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक २८ ऑक्टोबर रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास मांडवे घाटातून पिकअप वाहन जात असताना अज्ञात तिघांनी कार आडवी लावून चालकाला कोयत्याचा धाक दाखवला. कोंबड्या विकून आलेले रोख ३ लाख ४१ हजार रुपये आणि मोबाईल असा ऐवज लुटून नेल्याची तक्रार पारनेर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९(६), १२६, ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांनी तात्काळ तपास पथके रवाना केली. गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी संशयित आरिफ जाबीर खान (वय ३०, रा. मुकुंदनगर, अहिल्यानगर) व शोएब चाँद शेख (वय २९, रा. फकीरवाडा, अहिल्यानगर) यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली, मात्र धक्कादायक बाब म्हणजे हा संपूर्ण दरोड्याचा बनाव खुद्द फिर्यादी मजहर खुदाबक्ष शेख (वय ३२, रा. मुकुंदनगर, अहिल्यानगर) याच्याच सांगण्यावरून रचल्याचे त्यांनी उघड केले.

त्यानंतर पोलिसांनी फिर्यादी मजहर शेख याच्यासह तिन्ही आरोपींना अटक केली. त्यांच्या ताब्यातून १० लाख रुपये किमतीची मारुती अर्टिगा कार (क्रमांक MH 16 AT 4835), चोरीस गेलेली रोख ३ लाख ४१ हजार रुपयांची रक्कम आणि २० हजार रुपयांचा ओप्पो कंपनीचा मोबाईल असा एकूण १३ लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या १२ तासांच्या आत पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावत संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला.

सदरची उल्लेखनीय कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, सफौ पोपट रोकडे, गणेश डहाळे, पोहेकॉ अमोल धामणे, कल्याण लगड, पोकॉ गणेश डोंगरे, सारंग वाघ, सतिष शिंदे तसेच दक्षिण विभाग मोबाईल सेलचे पोकॉ राहुल गुंडू व अरुण सांगळे यांनी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास सफौ पोपट रोकडे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here