टाकळी ढोकेश्वरमधील घरफोडीचा छडा लावा, अन्यथा ४ नोव्हेंबरला रास्ता रोको

टाकळी ढोकेश्वर

चोरीस गेलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम न मिळाल्यास
वासुंदा चौकात आंदोलनाचा इशारा; पोलिसांना निवेदन सादर

अहिल्यानगर (जिल्हा क्राइम रिपोर्टर संजय शिंदे) | टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) येथे झालेल्या घरफोडी प्रकरणातील चोरांचा तात्काळ छडा लावून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करावा, अन्यथा येत्या बुधवारी (दि. ४ नोव्हेंबर २०२६) सकाळी १० वाजता वासुंदा चौक येथे तीव्र रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सौ. मंगल संतोष गोरडे यांनी पोलीस प्रशासनाला दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

टाकळी ढोकेश्वर येथील सौ. मंगल गोरडे यांच्या घरात २५ ऑक्टोबर २०२६ रोजी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली होती. या घटनेत घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास झाली. या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात तत्काळ फिर्याद देण्यात आली होती. मात्र, घटनेला अनेक दिवस उलटूनही पोलिसांकडून या चोरीचा तपास लागलेला नाही किंवा चोरीस गेलेला ऐवजही हस्तगत झालेला नाही. या चोरीमुळे कुटुंबीयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून संपूर्ण कुटुंबात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. वारंवार मागणी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने गोरडे कुटुंबीयांना तीव्र मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

या पार्श्वभूमीवर, पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तसेच अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे. “सदर गुन्ह्यातील आरोपींचा गांभीर्याने शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करावी आणि चोरीचा मुद्देमाल परत मिळवून द्यावा. जर ४ नोव्हेंबर २०२६ पर्यंत आरोपींचा शोध घेऊन ठोस कारवाई झाली नाही, तर टाकळी ढोकेश्वर येथील वासुंदा चौकात सकाळी १०.०० वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल,” असा स्पष्ट इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here