श्रेयवादापेक्षा कर्मचाऱ्यांना न्याय मिळणे महत्त्वाचे: डॉ. सुजय विखे पाटील

सुजय विखे पाटील

श्री साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीच्या दीपावली शिधावाटप कार्यक्रमाचा शिर्डीत शुभारंभ

शिर्डी (प्रतिनिधी तुषार महाजन) | “साईबाबांच्या आशीर्वादाने कर्मचाऱ्यांचे कल्याण होत असून, त्यांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळवून देणे हेच सर्वांत महत्त्वाचे आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर अनेकांनी प्रयत्न केले असतील, मात्र त्याचे राजकीय श्रेय लाटण्यापेक्षा कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्रत्यक्ष मार्गी लागणे गरजेचे आहे. सेवाशर्ती, वेतनातील तफावत, पदोन्नती यासह कर्मचाऱ्यांच्या सर्व प्रलंबित मागण्यांसाठी यापुढेही सातत्याने पाठपुरावा सुरूच राहील,” अशी ठाम ग्वाही भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.

शिर्डी येथे ‘श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड’च्या वतीने दीपावलीनिमित्त आयोजित शिधावाटप कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सोसायटीच्या सभासदांना व कर्मचाऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात शिधावाटप करण्यात आले.

समान पात्रता, मग वेतनात तफावत का?

कामगारांच्या समस्यांकडे लक्ष वेधताना डॉ. विखे पाटील म्हणाले की, समान शैक्षणिक पात्रता आणि समान कामाचा अनुभव असतानाही कर्मचाऱ्यांच्या वेतनात तफावत असणे अन्यायकारक आहे. ४८८ कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लागला असला, तरी शैक्षणिक पात्रतेच्या जाचक अटींमुळे प्रक्रियेत मागे राहिलेल्या जुन्या कर्मचाऱ्यांचा, तसेच वैद्यकीय व निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा संवेदनशीलतेने व धोरणात्मक निर्णय घेऊन विचार केला पाहिजे. संस्थानच्या नवीन विश्वस्त मंडळाची नियुक्ती झाल्यावर या कामांना आणखी गती मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शिर्डीच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी

शिर्डीच्या आगामी विकासकामांचा उल्लेख करताना ते म्हणाले की, कुंभमेळ्याच्या अनुषंगाने शहरात सुमारे ५० कोटींची विकासकामे सुरू असून संस्थानच्या माध्यमातून ३० कोटींच्या ‘थीम पार्क’ला मंजुरी मिळाली आहे. याशिवाय स्टेडियम व नाट्यगृहाची कामेही प्रस्तावित आहेत. शहर स्वच्छ, अतिक्रमणमुक्त व गुन्हेगारीमुक्त ठेवण्यासाठी सर्वांनी मिळून जबाबदारीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमास साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ गाडगीळकर, नगराध्यक्षा जयश्री थोरात, उद्योजक भाऊसाहेब चौधरी, साई निर्माण ग्रुपचे अध्यक्ष विजयराव कोते, चाणक्य न्यूज नेटवर्कचे रवींद्र जोशी, सोसायटीचे सचिव विलास वाणी, सहसचिव बाबासाहेब अनर्थे, सहायक सहसचिव संभाजी कोते यांच्यासह संचालक मंडळ, विविध पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र कोहकडे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here