टाकळी ढोकेश्वर येथे भरदिवसा घरफोडी; सव्वातीन लाखांचा ऐवज लांबवला

घरफोडी

पारनेर (तालुका क्राइम रिपोर्टर अनिल नागरे) | पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील खिलाडी वस्तीमध्ये भरदिवसा घरफोडीची घटना घडली असून, चोरट्यांनी घरातील कपाटाचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने आणि मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारला आहे. या चोरीमध्ये तब्बल ३ लाख १ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची फिर्याद मंगळ संतोष गोरडे यांनी पारनेर पोलीस ठाण्यात दिली आहे.

 

मिळालेल्या फिर्यादीनुसार, मंगळ संतोष गोरडे (वय ४५, रा. खिलाडी वस्ती, टाकळी ढोकेश्वर, ता. पारनेर) या पती संतोष, आई चंद्रभागा काशिनाथ खिलाडी यांच्यासह एकत्र राहतात आणि त्यांचा शेती व्यवसाय आहे. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास घराला कुलूप लावून कुटुंबीय शेतातील कामासाठी गेले होते. दुपारी सुमारे १:१० वाजण्याच्या सुमारास त्या शेतात असताना त्यांच्या घरजवळ तीन अनोळखी व्यक्ती आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

घरातील सर्वजण शेतात असल्याची संधी साधून चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटाचे कुलूप तोडून त्यामधील सोन्याचे दागिने व मौल्यवान वस्तू चोरून नेल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. चोरीला गेलेल्या ऐवजमध्ये सोन्याचे नेकलेस, सोन्याच्या दोन बांगड्या, सोन्याची कर्णफुले, सोन्याचे जोडले, सोन्याच्या शिंपल्या आणि सोन्याच्या १४ मण्यांचा ऐवज यांचा समावेश आहे. या सर्व दागिन्यांची एकूण किंमत अंदाजे ३ लाख १ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, दुपारी घरी परतल्यानंतर घरातील कपाटाचे कुलूप तुटलेले व सामान अस्तव्यस्त झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर घरातील दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले. तीन अनोळखी व्यक्तींनी घरफोडी करून दागिने चोरून नेल्याचा संशय व्यक्त करत मंगळ गोरडे यांनी पारनेर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. भरदिवसा, घराला कुलूप असल्याची संधी साधून झालेली या घरफोडीमुळे परिसरात चिंता व्यक्त होत असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून चोरट्यांचा शोध घ्यावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here