अनवाणी पावलांना मिळाला मायेचा आधार, उन्हाच्या झळांमध्ये विद्यार्थ्यांना दिलासा

विद्यार्थ्यांना दिलासा

उद्योजक भाऊसाहेब चौधरी यांचा संवेदनशीलतेचा अनोखा आदर्श, ३०० विद्यार्थ्यांना चप्पल, शारदा शैक्षणिक संकुलाला १७ पंख्यांची भेट

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) | एखाद्याच्या अडचणी पाहून केवळ हळहळ व्यक्त करण्यापेक्षा त्या दूर करण्यासाठी पुढाकार घेणे, हीच खरी माणुसकी! याच संवेदनशीलतेचा प्रत्यय नांदुरखी येथील प्रसिद्ध उद्योजक व साईभक्त भाऊसाहेब रामचंद्र चौधरी यांनी पुन्हा एकदा दिला. रयत शिक्षण संस्थेच्या शारदा शैक्षणिक संकुलातील अनवाणी पायांनी शाळेत येणाऱ्या जवळपास ३०० विद्यार्थ्यांना त्यांनी मोफत चप्पल उपलब्ध करून दिल्या. तसेच वाढत्या तापमानाचा विचार करून वर्गांसाठी क्रॉम्प्टन कंपनीचे १७ पंखे भेट दिले. विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला, तर शालेय संघाला ५ हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले. या उपक्रमांतर्गत एकूण सुमारे ८० हजार रुपयांची मदत करण्यात आली.

 

भाऊसाहेब चौधरी हे राहाता शहरातून प्रवास करत असताना त्यांच्यासमवेत चाणक्य न्यूज नेटवर्कचे रवींद्र जोशी होते. शारदा शैक्षणिक संकुलासमोरून जाताना काही विद्यार्थी अनवाणी पायांनी शाळेत जात असल्याचे चौधरी यांच्या निदर्शनास आले. उन्हाची तीव्रता आणि रस्त्यावरील खड्यांमुळे विद्यार्थ्यांना होणारा त्रास पाहून त्यांचे मन हेलावले. आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना चप्पलविना शाळेत जावे लागत असल्याची जाणीव होताच त्यांनी या विद्यार्थ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला.

 

त्यांनी रवींद्र जोशी यांना विद्यार्थ्यांची माहिती घेण्यास सांगितले. त्यानुसार जोशी यांनी संकुलाचे मार्गदर्शक रमेश शिंदे यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली. शाळेतील जवळपास ३०० गरजू विद्यार्थ्यांची यादी तयार करून चौधरी यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांना चप्पल उपलब्ध करून देण्यात आल्या. या मदतीमुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला.

विद्यार्थ्यांना चप्पल देण्याबरोबरच त्यांच्या शैक्षणिक वातावरणातील अडचणींकडेही भाऊसाहेब चौधरी यांनी लक्ष दिले. वाढत्या तापमानामुळे वर्गांमध्ये बसून अभ्यास करताना विद्यार्थ्यांना उकाड्याचा त्रास होत असल्याचे रवींद्र जोशी यांच्या निदर्शनास आले. त्यांनी प्रत्यक्ष वर्गांना भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मोठ्या वर्गांमध्ये पुरेशी हवा मिळण्यासाठी अतिरिक्त पंख्यांची आवश्यकता असल्याचे लक्षात आल्यानंतर शाळेच्या गरजेनुसार एकूण १७ पंखे भेट देण्यात आले.

 

एका बाजूला अनवाणी विद्यार्थ्यांना चप्पलांचा आधार, तर दुसऱ्या बाजूला उकाड्यात अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना पंख्यांमुळे मिळणारा दिलासा, या उपक्रमातून चौधरी यांच्या सामाजिक संवेदनशीलतेचे दर्शन घडले.

या कार्यक्रमात तालुका व जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा भाऊसाहेब चौधरी व रवींद्र जोशी यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन देण्यात आले. तसेच शालेय संघाला ५ हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले.

संकुलातील विद्यार्थी आकाश बोठे याला इन्स्पायर अवॉर्ड मिळाल्याबद्दल त्याचाही गौरव करण्यात आला. त्याला मार्गदर्शन करणाऱ्या साबळे सरांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संकुलाचे मार्गदर्शक रमेश शिंदे होते. त्यांच्या हस्ते भाऊसाहेब चौधरी व रवींद्र जोशी यांचा संकुलाच्या वतीने सन्मान करण्यात आला. भारतीय संस्कृतीत दानधर्माला विशेष महत्त्व असून, गरजूंची गरज ओळखून योग्य वेळी मदत करणे हा दैवी गुण आहे. भाऊसाहेब चौधरी यांच्या कार्यातून हा गुण दिसून येतो, असे रमेश शिंदे यांनी नमूद केले.

यावेळी उपस्थित सुमन वाबळे यांनीही चौधरी यांच्या दातृत्वाचे कौतुक केले. ते आपल्या संपत्तीतील काही हिस्सा विविध शाळांमधील विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी खर्च करतात. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी आजपर्यंत मदत केली असून, त्यांच्या या सामाजिक कार्याचा अभिमान वाटतो, असे त्यांनी सांगितले.

भाऊसाहेब चौधरी यांचे विविध राज्यांत तसेच परदेशात व्यवसाय आहेत. उद्योजक म्हणून यशस्वी वाटचाल करत असतानाच ते साईबाबांच्या शिकवणुकीतील मानवसेवेचा विचार आपल्या कृतीतून जपतात. मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी योगदान, गरजू व्यक्तींना मदत, धार्मिक उपक्रमांना सहकार्य आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप अशा विविध माध्यमांतून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.

शारदा शैक्षणिक संकुलाची शैक्षणिक गुणवत्ता, क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे यश आणि संकुलातील अनेक माजी विद्यार्थी उच्च पदांवर कार्यरत असल्याची माहिती जाणून घेतल्यानंतर त्यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.

या उपक्रमासाठी चाणक्य न्यूज नेटवर्कचे रवींद्र जोशी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ते रयत शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी असून, शारदा शैक्षणिक संकुलात स्पर्धा परीक्षांविषयी मार्गदर्शनपर व्याख्याने घेतात. त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या गरजा भाऊसाहेब चौधरी यांच्यापर्यंत पोहोचल्या आणि या मदतीचा मार्ग खुला झाला.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भाऊसाहेब चौधरी यांनी नियमित व्यायाम करावा, चांगले मित्र जोडावेत आणि निरोगी व आनंदी जीवन जगण्याला प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले. केवळ पैसा कमावणे किंवा नाव मिळवणे म्हणजे यशस्वी जीवन नव्हे, तर चांगले आरोग्य जपणे आणि आनंदाने जीवन जगणे हेच खऱ्या यशाचे लक्षण असल्याचे त्यांनी सांगितले. साईबाबांचे विचार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचले पाहिजेत, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे नियोजन संकुलाच्या प्राचार्या शीला संसारे व कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक राजकुमार साळवे यांनी केले. प्रास्ताविक विवेक गाडेकर यांनी केले, सूत्रसंचालन रमेश आहेर यांनी केले, तर प्रा. बाळासाहेब दिघे यांनी आभार मानले. यावेळी प्रा. शरद गमे, बाळासाहेब दिघे, किशोर लोहारकर, पर्वत उरे, संजय खंदारे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व इतर मान्यवर उपस्थित होते.

चप्पल नसलेल्या विद्यार्थ्यांना चप्पल आणि उकाड्यात शिक्षण घेणाऱ्या मुलांना पंखे उपलब्ध करून देणे, ही केवळ वस्तुरूप मदत नसून त्यांच्या अडचणी समजून घेणाऱ्या संवेदनशील मनाची साक्ष आहे. जवळपास ३०० विद्यार्थ्यांना मदत आणि एकूण सुमारे ८० हजार रुपयांच्या भेटवस्तू व बक्षिसांच्या माध्यमातून भाऊसाहेब चौधरी यांनी सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.

दुसऱ्यांच्या अडचणी ओळखून त्यांना मदतीचा हात देणे, हाच खऱ्या अर्थाने साईविचारांचा आणि माणुसकीचा संदेश आहे. भाऊसाहेब चौधरी यांच्या या उपक्रमाचे विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि राहाता परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here