दैनिक ‘राष्ट्र सह्याद्री’च्या सातव्या वर्धापनदिनानिमित्त नवी दिल्लीत सन्मान; सामाजिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव
शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) | सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेले सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब चौधरी यांना दैनिक ‘राष्ट्र सह्याद्री’च्या वतीने दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या ‘सह्याद्री सेवा रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दैनिक ‘राष्ट्र सह्याद्री’च्या सातव्या वर्धापनदिनानिमित्त देशाची राजधानी नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे आयोजित भव्य मराठी मेळावा व पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांचा हा गौरव करण्यात आला. सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत करण्यात आलेला हा सन्मान त्यांच्या कार्याला मिळालेली महत्त्वपूर्ण पावती मानली जात आहे.
महाराष्ट्राच्या विविध भागांत सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, पत्रकारिता, उद्योग, प्रशासन आणि इतर क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने दैनिक ‘राष्ट्र सह्याद्री’च्या वतीने या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात विविध क्षेत्रांतील गुणवंतांना ‘सह्याद्री रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आले; त्यात भाऊसाहेब चौधरी यांना ‘सह्याद्री सेवा रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दैनिक ‘राष्ट्र सह्याद्री’चे संस्थापक-संपादक करण नवले यांच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, उद्योजक आणि महाराष्ट्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव करण्याबरोबरच समाजासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. महाराष्ट्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव थेट देशाच्या राजधानीत झाल्याने या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
समाजाच्या विकासासाठी सामाजिक कार्यकर्त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. लोकहिताच्या उपक्रमांना प्रोत्साहन देणे आणि समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणणे या कार्याला अशा राष्ट्रीय सन्मानांमुळे बळ मिळते. भाऊसाहेब चौधरी यांना मिळालेला ‘सह्याद्री सेवा रत्न’ पुरस्कार हा त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरणारा असून, समाजहितासाठी कार्य करणाऱ्या प्रत्येकाला ऊर्जा देणारा ठरला असल्याची भावना या प्रसंगी व्यक्त करण्यात आली.







