चंद्रशेखर बावनकुळेंच्या अपमानाविरोधात तेली समाज आक्रमक; आमदार नितीन देशमुखांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

चंद्रशेखर बावनकुळें

नाशिक (प्रतिनिधी सतिश शेवाळे) | राज्याचे महसूल मंत्री तथा तेली समाजाचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबद्दल बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांनी केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा आक्रमक झाली आहे. या प्रकरणी आमदार देशमुख यांच्याविरोधात तातडीने गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र धरणे आंदोलन आणि निषेध निदर्शने करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

 

दिनांक ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या एका व्हिडिओचा संदर्भ देत महासभेने हे निवेदन सादर केले. संबंधित व्हिडिओमध्ये आमदार नितीन देशमुख यांनी शासकीय कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना दमदाटी केली, तसेच महसूल मंत्री बावनकुळे यांच्याबद्दल “बावनकुळे मंत्री नाही, तो ठेकेदार आहे” असे अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप महासभेने निवेदनात केला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे हे ओबीसी समाजातील ज्येष्ठ नेते असून तेली समाजाचे मानबिंदू आहेत. त्यांच्याबद्दल करण्यात आलेल्या अशा वक्तव्यामुळे संपूर्ण तेली समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला असून समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचे महासभेने निवेदनात नमूद केले आहे. लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक जीवनात जबाबदारीने आणि संयमाने वक्तव्य करणे आवश्यक असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.

महासभेकडून  आमदार नितीन देशमुख यांच्याविरोधात शासकीय कामात अडथळा आणणे, बदनामी करणे आणि धमकी दिल्याप्रकरणी सखोल चौकशी करून तात्काळ एफआयआर (FIR) दाखल करण्यात यावा व संबंधित व्हिडिओची सत्यता तपासून तो प्रसारित करणाऱ्या व्यक्तींची भूमिका तपासावी व दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी. अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदन देताना महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे नाशिक महानगर अध्यक्ष अर्जुन वेताळ, महानगर सचिव सचिन शिंदे, नवीन नाशिक तेली समाजाचे अध्यक्ष बी. जी. दादा चौधरी, महानगर उपाध्यक्ष रमेश चौधरी, गणेश बोरसे, विनायक कस्तुरे, महानगर सहसचिव वसंत चौधरी, नवीन नाशिक विभागीय निरीक्षक शिवाजीराव चौधरी, सातपूर विभागीय अध्यक्ष राजेंद्र चौधरी, नवीन नाशिक विभागीय अध्यक्ष रघुनाथ चौधरी, व्यापार-उद्योग आघाडीचे अरुण क्षीरसागर, सुरेश पिंगळे, हेमंत चौधरी, दिलीप चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

या प्रकरणाची तातडीने दखल न घेतल्यास राज्यभरातील तेली समाजबांधव रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, असा स्पष्ट इशाराही महासभेकडून देण्यात आला आहे.तेली समाज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here