मालेगावातील रावळगाव येथे दुधाचा बनला रबर; भेसळखोरांवर कठोर कारवाई करा

दुधाचा बनला रबर

अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची निवेदनाद्वारे मागणी

नाशिक (उपसंपादक इंजि कुबेर जाधव) | तालुक्यातील रावळगाव येथे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त चुलीवर तापत ठेवलेल्या २५ लिटर दुधाचा चक्क रबरासारखा लवचिक व चिकट पदार्थ तयार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुमारे आठ ते दहा फूट उंच उचलूनही न तुटणाऱ्या या रबरसदृश दुधाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला असून, या घटनेमुळे सर्वसामान्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या गंभीर प्रकाराची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी आग्रही मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अन्न सुरक्षा व भेसळ प्रतिबंधक विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, रावळगाव परिसरातील एका वस्तीवर हिंदू संस्कृतीनुसार कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यासाठी अंदाजे २५ लिटर दूध चुलीवर आटवण्यासाठी ठेवण्यात आले होते. लहान मुलांसह आबालवृद्धांसाठी तयार करण्यात येत असलेल्या या दुधावर प्रक्रिया होत असताना अचानक ते रबरासारखे ताणले जाऊ लागले. हे दूध ८ ते १० फूट उंचावर ओढले तरी तुटत नसल्याचे उपस्थितांच्या निदर्शनास आले. सुदैवाने कार्यकर्त्यांच्या आणि नागरिकांच्या ही बाब वेळीच लक्षात आल्याने हे दूध कोणाच्याही पोटात गेले नाही आणि मोठा अनर्थ टळला. सामान्यतः दूध शिळे अथवा नासले तरी ते फाटते, मात्र अशा प्रकारे रबरासारखे ताणले जात नाही. त्यामुळे या दुधात मोठ्या प्रमाणावर घातक रसायने किंवा कृत्रिम पदार्थांची भेसळ झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.

गावोगावी सुरू झालेली दूध संकलन केंद्रे उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक असली, तरी मध्यस्थ आणि खरेदीदार डेअरी चालकांकडून नफेखोरीसाठी असा जीवघेणा भेसळीचा खेळ चालवला जात असल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात आहे. लहान मुले, वृद्ध यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा भेसळखोरांवर सरकारी यंत्रणेचा व अन्न-औषध प्रशासनाचा कसलाही धाक राहिलेला नाही का, असा संतप्त सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

दरम्यान, अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे आपल्या कर्तव्यदक्ष व धडक कार्यपद्धतीसाठी ओळखले जातात. त्यामुळे प्रयोगशाळेच्या तपासणी अहवालाची महिने-दोन महिने वाट न पाहता, प्रशासनाने तत्काळ विशेष मोहीम राबवून या प्रकरणाची खातरजमा करावी. तसेच संबंधित दूध संकलन केंद्रे व संशयितांची सखोल चौकशी करून मुळाशी जावे आणि दोषींवर अजामीनपात्र गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. प्रामाणिकपणे कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी राज्य शासनानेही खंबीरपणे उभे राहावे, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here