साखर व इथेनॉल दराचा तिढा सुटत नाही तोपर्यंत ऊस न देण्याचा निर्धार; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा ऊसतोड बंदीचा निर्णय

स्वाभिमानी शेतकरी

नाशिक (उपसंपादक इंजि कुबेर जाधव) | जोपर्यंत केंद्र व राज्य सरकार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत साखर आणि इथेनॉलच्या दराबाबत सकारात्मक चर्चा करत नाही, तोपर्यंत साखर कारखान्यांना ऊस न देण्याचा ठाम निर्धार निफाड तालुक्यातील कोळगाव व खेडलेझुंगे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी घेतला आहे. कोळगाव येथे पार पडलेल्या शेतकऱ्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा ऊसतोड बंदीचा निर्णय एकमुखाने मंजूर करण्यात आला.

 

चालू हंगामात अल्प पावसामुळे उसाची अपेक्षित वाढ झालेली नाही. त्यामुळे उसाचा उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. अशा बिकट परिस्थितीत केंद्र व राज्य सरकारने १५ ऑक्टोबरपासून साखर कारखाने सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, दुष्काळी स्थितीत शेतकऱ्यांच्या हातात केवळ ऊस हेच एकमेव पीक शिल्लक आहे. सध्याच्या घडीला उसाला पाणी दिल्यास पिकाची वाढ होण्यास मदत होणार आहे.

तसेच नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी महिन्यांत उसाचे खोडवे ठेवल्यास उन्हाची तीव्रता कमी असल्याने पुढील हंगामासाठी पीक राखणे शेतकऱ्यांसाठी सोयीचे ठरेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाईघाईत ऊस तोडणी न देता न घाबरता संयम बाळगावा, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले. साखर कारखान्यांनी तात्काळ ऊसतोड थांबवली नाही, तर नाशिक जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

या बैठकीस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे पाटील, निफाड तालुकाध्यक्ष गजानन आबा घोटेकर, कोळगाव सहकारी सोसायटीचे चेअरमन प्रताप घोटेकर, दत्तात्रेय घोटेकर, दत्तात्रय गोरडे, नामदेव घोटेकर, सुदाम साबळे, विश्वनाथ घोटेकर, अशोक गीते, दीपक घोटेकर, सागर गवळी, संतोष तासकर, सुनील गवळी, केदारनाथ घोटेकर, संतोष घोटेकर, हौशीराम घोटेकर, गणेश घोटेकर, पोपट घोटेकर, महेश घोटेकर, ज्ञानेश्वर गारे यांच्यासह परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here