खटाव तालुक्यातील बेकायदा कत्तलखान्यावर वडूज पोलिसांचा धडक छापा; १ टन गोमांस जप्त

वडूज पोलिस

सातारा (उपसंपादक लव चव्हाण) | जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील दगडवाडी गावच्या शिवारात सुरू असलेल्या बेकायदा गोमांस कत्तलखान्यावर वडूज पोलिसांनी रात्रीच्या सुमारास धडक छापा टाकला. या धडक कारवाईत पोलिसांनी तब्बल १ टन गोमांसाचा साठा जप्त केला असून काही जिवंत जनावरे व गुन्ह्यात वापरलेली दोन वाहने ताब्यात घेतली आहेत. या कारवाईमुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

 

दगडवाडी गावच्या हद्दीत काही व्यक्ती गोवंश हत्या करून मोठ्या प्रमाणावर गोमांसाची अवैध विक्री करत असल्याची माहिती समोर आली होती. हा प्रकार स्थानिक गोरक्षक दलाच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ वडूज पोलिसांशी संपर्क साधून सविस्तर माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता रात्रीच्या वेळी दगडवाडी परिसरातील संशयित ठिकाणी छापा टाकला.

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता तेथे सुमारे १ टन मांस आढळून आले. तसेच कत्तलीसाठी आणलेली काही जिवंत जनावरेही तेथे बांधलेली मिळून आली. पोलिसांनी जनावरांची तात्काळ सुटका केली असून जप्त केलेला संशयित मांसाचा साठा नियमानुसार नष्ट केला आहे. याशिवाय घटनास्थळावरून दोन संशयित वाहनेही जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांची चाहूल लागताच पसार झालेल्या संशयित आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

ही धडक कारवाई वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विक्रांत पाटील, पोलीस उपनिरीक्षक रणधीर कर्चे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र सदगर, पोलीस हवालदार शिवाजी खाडे, गणेश शिरकुळे यांच्यासह पोलीस अंमलदारांच्या पथकाने केली. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here