महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत नवरात्रोत्सवाला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. नऊ दिवस आदिशक्तीची पूजा-अर्चा, घटस्थापना आणि गरबा-दांडियाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळतो. या पावन पर्वात मंदिरांमध्ये तसेच सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांमध्ये भाविक मोठ्या श्रद्धेने देवीच्या चरणी साड्या, खण, नारळ आणि इतर ओटीचे साहित्य अर्पण करतात. मात्र, उत्सव संपल्यानंतर या साहित्याचे काय होते? अनेक ठिकाणी हा प्रसाद साठवून राहतो किंवा त्याचा योग्य विनियोग कसा करावा, हा प्रश्न निर्माण होतो.
या पार्श्वभूमीवर, देवीच्या चरणी अर्पण होणारा हा पवित्र प्रसाद गरजू, गरीब, अपंग व उपेक्षित घटकातील महिलांपर्यंत सन्मानाने पोहोचवण्याचा विचार पुढे येत आहे. हा केवळ एक उपक्रम नाही, तर तो अंतःकरणातील संवेदनशीलतेचा आणि मानवतावादाचा एक अत्यंत सुंदर आविष्कार ठरू शकतो.
संत तुकाराम महाराजांच्या जीवनातील प्रसंगांमधून मानुसकीचा खरा धर्म काय असतो, याची अनुभूती आपल्याला मिळते. संकटकाळात महाराजांनी स्वतःकडील धन-धान्य गरिबांत वाटून ‘नारायण सेवा’ हीच खरी ईश्वरसेवा असल्याचा संदेश दिला. आपली संस्कृती ‘जीव हाच शिव मानून’ उपाशीला अन्न आणि गरजवंताला वस्त्र देण्याला सर्वोच्च पूजा मानते. नवरात्रीत ज्या आदिशक्तीची आपण पूजा करतो, ती शक्ती प्रत्येक स्त्रीमध्ये वसलेली आहे. त्यामुळे समाजातील कष्टकरी व वंचित भगिनींना साडी आणि ओटीचा मान देणे, म्हणजेच खऱ्या अर्थाने स्त्रीशक्तीचा प्रत्यक्ष सन्मान करणे आहे.
आजकाल मंदिरांमध्ये आणि उत्सव मंडळांत मोठ्या प्रमाणात साड्या व वस्तू अर्पण होतात. जर मंदिराच्या विश्वस्तांनी आणि सार्वजनिक उत्सव मंडळांनी एक नवा व स्तुत्य पायंडा पाडला—की देवीच्या चरणी आलेला प्रसाद केवळ मंदिरात पडून न राहता, उत्सव संपताच परिसरातील गरजू भगिनींना वितरीत केला जाईल—तर या उत्सवाचे पावित्र्य आणि सामाजिक तेज अधिकच उजळून निघेल.
सणासुदीच्या दिवसांत नवीन कपडे परिधान करणे ही प्रत्येकाची इच्छा असते; परंतु गरिबीमुळे अनेक कुटुंबांना सणाचा आनंद घेता येत नाही. अशा वेळी जेव्हा एखादी वंचित महिला देवीची प्रासादिक साडी परिधान करते, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर उमटणारा आनंद अनमोल असतो. यामुळे श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी मिटण्यास मदत तर होतेच, शिवाय समाजात आपुलकी व बंधुभावाचे नवे नाते घट्ट होते.
कोणतीही चांगली चळवळ सुरू होण्यासाठी विचारांची देवाणघेवाण आणि लोकजागृती आवश्यक असते. हा विचार जर प्रमुख मंदिर समित्या, उत्सव मंडळे आणि दानशूर व्यक्तींनी स्वीकारला, तर त्याचे रूपांतर एका सुंदर सामाजिक चळवळीत होऊ शकते. प्रसाद वाया जाण्यापेक्षा तो गरजवंतांच्या संसाराला आधार देणारा ठरणे, हीच आपल्या संस्कृतीची खरी सात्त्विक ओळख बनेल.
हे केवळ एक आवाहन नसून काळाची गरज असलेला एक संवेदनशील सामाजिक संदेश आहे. मंदिरांचे विश्वस्त, उत्सव मंडळे आणि समाजबांधवांनी या विचाराची गांभीर्याने अंमलबजावणी केल्यास नवरात्रीचा खरा आनंद तळागाळातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल. त्या गरीब भगिनींच्या चेहऱ्यावरील हास्य हीच जगदंबेची खरी पूजा ठरेल!
– कुबेर जाधव
मोबाईल: ९४२३०७२१०२







