स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी; सोलापुरात ५८० किलो प्रतिबंधित सुगंधित तंबाखूसह देशी-विदेशी दारू जप्त

देशी-विदेशी दारू जप्त

पंढरपूर (तालुका रिपोर्टर प्रकाश इंगोले) | सोलापूर ग्रामीण भागात अवैध धंदे आणि अंमली पदार्थांच्या विक्रीविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने मोठी धडक कारवाई केली आहे. मोहोळ तालुक्यात केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये ५८० किलो प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि अवैध देशी-विदेशी दारू असा एकूण ४,८१,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्ह्यात अवैध दारू आणि अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी पथकाला सतर्क केले होते.

दरम्यान, दि. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी सहायक पोलीस निरीक्षक विशाल मुळे व त्यांचे पथक मोहोळ पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घाालत असताना, पथकातील पोलीस कॉन्स्टेबल हरिष थोरात व बाळराजे घाडगे यांना गोपनीय बातमीदारा मार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, सुधाकर प्रभू मांडवे रा. मांडवे वस्ती (ता. मोहोळ) याच्या शेतातील पत्राच्या शेडमध्ये प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा मोठ्या प्रमाणावर साठा करून ठेवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीची खात्री करून पो.नि. संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, मोहोळ पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने संयुक्तपणे मांडवे वस्ती येथील पत्रा शेडवर छापा टाकला.

या कारवाईदरम्यान पत्रा शेडमध्ये पांढऱ्या रंगाची १२ प्लास्टिक पोती आढळून आली. पोती उघडून तपासणी केली असता त्यामध्ये: १. विना लेबल असलेली पिवळ्या रंगाच्या पॉकेटमधील सुगंधित तंबाखूची ५ पोती (एकूण ६०० पाकिटे, किंमत २,४०,०००/- रुपये). २. ‘गुडलक’ सुंगधित तंबाखूची ७ पोती (एकूण ५६० पाकिटे, किंमत २,२४,०००/- रुपये) असा एकूण ४,६४,०००/- रुपयांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला असून, पुढील कायदेशीर कारवाईसाठी तो मोहोळ पोलीस ठाण्यात आणण्यात आला आहे. तसेच संबंधिताचे पत्रा शेड अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत सीलबंद करण्यात आले आहे. याप्रकरणी सुधाकर प्रभू मांडवे याच्याविरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांनुसार व अन्न सुरक्षा व मानदे कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

याशिवाय, मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोखरापूर येथे दादासाहेब राजाराम नरोटे हा इसम १७,०००/- रुपये किमतीची देशी-विदेशी कंपनीची दारू अवैधरित्या विक्री करताना रंगेहात सापडला. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर धडाकेबाज कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. संजय जगताप आणि मोहोळचे पो.नि. दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विशाल मुळे, पोलीस अंमलदार मनोज भंडारी, पंकज महिंद्रकर, सिद्धराम कंटोळी, व्यंकटेश मोरे, राहुल दोरकर, हरिष थोरात, बाळराजे घाडगे तसेच मोहोळ पोलीस ठाण्याच्या अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here