उत्कृष्ट गोळीबार कौशल्यात सोलापूरचे API श्रीनाथ महाडिक प्रथम; इस्रायलच्या धर्तीवर मिळाले प्रशिक्षण

श्रीनाथ महाडिक

पंढरपूर (तालुका रिपोर्टर प्रकाश इंगोले) | भविष्यातील कोणत्याही आव्हानात्मक परिस्थितीला प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना अधिक सक्षम बनवण्याच्या उद्देशाने राज्यभर विशेष गोळीबार प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयात झालेल्या विशेष प्रशिक्षणात सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) श्रीनाथ महाडिक यांनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

 

मुंबईवरील २६/११ सारख्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची रणनीती आणि कौशल्य अधिक धारदार करण्यासाठी पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या संकल्पनेतून हा विशेष गोळीबार प्रशिक्षण उपक्रम राज्यभरात हाती घेण्यात आला आहे. यात इस्रायलमधील कमांडो प्रशिक्षणाच्या धर्तीवर पोलिसांना मूलभूत व आधुनिक गोळीबाराचे धडे दिले जात आहेत.

सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयात पार पडलेल्या या कठीण आणि स्पर्धात्मक प्रशिक्षण सत्रादरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनाथ महाडिक यांनी आपल्या अचूक निशाणेबाजीची, उत्तम एकाग्रतेची आणि आत्मविश्वासपूर्ण कामगिरीची चुणूक दाखवली. या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर त्यांनी प्रथम क्रमांक मिळवत सोलापूर पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

श्रीनाथ महाडिक यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय परिसरात त्यांचा विशेष सत्कार सोहळा पार पडला. यावेळी पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील यांनी स्वतः श्रीनाथ महाडिक यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव केला. त्यांच्या या यशाचे शहर पोलीस दलातील आजी-माजी वरिष्ठ अधिकारी, सहकार्‍यांकडून कौतुक केले जात असून, हे यश इतर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here