कोल्हापूर (प्रतिनिधी रहिम पिंजारी) । आगामी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेने एक मोठी मोहीम हाती घेतली आहे. रस्त्यांच्या कडेला अनेक दिवसांपासून बेवारस आणि धूळ खात पडलेल्या वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता, पोलिसांनी दोन दिवसांत तब्बल १६० चारचाकी आणि ४१ दुचाकी वाहने हटवण्याची धडक कारवाई केली आहे.
नवरात्रोत्सवाच्या काळात कोल्हापूर शहरात जिल्ह्यातून, इतर जिल्ह्यांतून तसेच राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक आपल्या वाहनांसह येतात. या काळात शहरात वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (शहर विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने राजारामपुरी हद्दीतील यादवनगर, माउली पुतळा, पांजरपोळ, गोखले कॉलेज परिसर तसेच लक्ष्मीपुरी हद्दीतील दसरा चौक ते व्हीनस कॉर्नर, सीपीआर ते सारस्वत बँक आणि जेल रोड या परिसरात ही मोहीम राबवण्यात आली. दिनांक ७ ऑक्टोबर आणि ८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी १२:०० या वेळेत ही विशेष मोहीम राबवून रस्त्याला अडथळा ठरणारी वाहने वाहनधारकांना बोलावून हटवण्यात आली. तसेच अनेक वाहने स्पीकरद्वारे अनाउन्समेंट करून हटवून घेण्यात आली आहेत.
शहर वाहतूक शाखेच्या वतीने सर्व नागरिक आणि वाहनधारकांना आवाहन करण्यात आले आहे की, नवरात्रोत्सवाच्या काळात रस्त्याच्या कडेला धूळ खात पडणारी वाहने पार्क करू नयेत, तसेच दुचाकी वाहनांचे डबल पार्किंग करू नये. सध्या अशा वाहनांवर नोटीस चिकटवण्याची प्रक्रिया सुरू असून, नोटीस देऊनही वाहन न हटवल्यास ते वाहन महानगरपालिकेच्या संयुक्त कारवाईने टोईंग केले जाईल आणि दंडात्मक कारवाई केली जाईल. आगामी काळात ही मोहीम संपूर्ण शहरात अधिक व्यापक आणि तीव्र स्वरूपात राबवली जाणार आहे.
ही कारवाई शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या निरीक्षणाखाली, पोसई श्री. पालखे, पोसई श्री. गिरीगोसावी आणि पोलीस अंमलदारांच्या पथकाने केली आहे.







