मोठ्या गुन्ह्यातील फरार आरोपींना राजारामपुरी पोलिसांकडून पुण्यातून अटक; पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

राजारामपुरी पोलिस

कोल्हापूर (प्रतिनिधी रहिम पिंजारी) | राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका गंभीर गुन्ह्यातील गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेल्या दोन सराईत आरोपींना अटक करण्यात राजारामपुरी पोलिसांना मोठे यश आले आहे. त्र्यंबक वसंत गवळी (वय ३९) आणि अमित हनुमंत गवळी (वय १९, दोघे रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने पुण्यात वेशांतर करून आणि पाळत ठेवून ही धडाकेबाज कारवाई केली.

१५ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री राजारामपुरी परिसरातील लोखंडे वखार जवळ अंतर्गत वादातून आणि आर्थिक फायद्यासाठी फिर्यादी आणि त्यांच्या मित्रावर पूर्ववैमनस्यातून जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका – MCOCA) अंतर्गत कलमे वाढवण्यात आली होती. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी तेव्हापासून फरार होते.

आरोपींचा शोध घेत असताना राजारामपुरी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, फरार आरोपी त्र्यंबक गवळी आणि अमित गवळी हे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव जवळील जांभूळवाडी तलाव परिसरात नाव बदलून राहत आहेत. माहिती मिळताच पोलीस पथक तातडीने पुण्यात दाखल झाले.

संबंधित परिसर हा दाट लोकवस्तीचा, झोपडपट्टीचा आणि गर्दीचा असल्याने आरोपींना संशय येऊ नये म्हणून पोलीस पथकाने तिथे वेशांतर केले. दिवसभर संपूर्ण परिसराची बारकाईने पाहणी व पाळत ठेवल्यानंतर, पोलिसांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले.

दोन्ही आरोपींना कोल्हापुरात आणून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना ०७ नोव्हेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास शाहूवाडी उपविभागाचे पोलीस अधिकारी श्री. प्रणील गिल्डा करत आहेत.

ही धडक कारवाई कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. विकास जाधव, पोलीस उपनिरीक्षक श्री. रुपेश इंगळे, अंमलदार विशाल शिरगावकर, मिलींद बांगर, शाहू तळेकर आणि गजानन हराळे यांच्या पथकाने केली. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here