निघोज (प्रतिनिधी प्रविण वराळ) | “एक संकल्प… एक श्रद्धा… एकजूट सेवेकऱ्यांची आणि स्वामींच्या चरणी समर्पित एक भव्य दिव्य कार्य” या भावनेतून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने रांधे (माळवाडी) येथील स्वामी समर्थ देवस्थानासाठी एका भव्य दिव्य महारथाची निर्मिती करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
या ऐतिहासिक व पवित्र कार्याची जबाबदारी सर्वानुमते निश्चित करण्यात आली असून, ज्येष्ठ मार्गदर्शक व स्वामी सेवेकरी डॉ. निवृत्ती पाणमंद (निघोज) यांच्या अध्यक्षतेखाली महारथ निर्माण समितीची स्थापना करण्यात आली आहे. देवस्थानचे संस्थापक श्री. अनिल आवारी, अध्यक्ष श्री. सुभाष भोसले, उपाध्यक्ष श्री. किसन चौधरी यांच्यासह देवस्थानच्या सर्व विश्वस्त, पदाधिकारी आणि सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या कार्यावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले.
नवनिर्वाचित महारथ निर्माण समितीच्या अध्यक्षपदी डॉ. निवृत्ती पाणमंद (निघोज), कार्याध्यक्षपदी श्री. भास्कर औटी (साकोरी), उपाध्यक्षपदी श्री. सुधीर परंडवाल (अळकुटी), सचिवपदी श्री. प्रवीण वराळ (निघोज), खजिनदारपदी श्री. अनिल गाडगे (भोयरे फाटा) यांची निवड करण्यात आली असून श्री स्वामी समर्थ देवस्थानचे सर्व सेवेकरी कार्यकारिणी सदस्य असणार आहेत. हा महारथ केवळ एक लाकडी अथवा धातूची रचना नसून, संपूर्ण पंचक्रोशीतील स्वामी भक्तांच्या श्रद्धेचे, समर्पणाचे आणि सामूहिक भक्तीचे मूर्तिमंत रूप ठरणार आहे. या निर्मिती प्रक्रियेत आर्थिक सहकार्य, वास्तुशिल्प नियोजन, जनसंपर्क आणि श्रमदान अशा प्रत्येक पातळीवर सर्व सेवेकऱ्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. हे कार्य कोणा एका घटकाचे नसून संपूर्ण स्वामी परिवाराचे आहे, अशी भावना या बैठकीत व्यक्त करण्यात आली. लवकरच काम पूर्ण होऊन हा महारथ देवस्थानच्या प्रांगणात दाखल होईल आणि हा सोहळा देवस्थानच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदवला जाईल, त्यामुळे सर्व भाविक आणि सेवेकऱ्यांनी हे देवकार्य स्वतःचे मानून यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन नवनिर्वाचित समिती व देवस्थान पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.







