टाकळी ढोकेश्वर येथील घरफोडीचा गुन्हा उघडकीस, १७ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त
अहिल्यानगर (जिल्हा क्राइम रिपोर्टर संजय शिंदे) | टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) येथील एका बंद घराचे कुलूप तोडून ऐवज लांबवणाऱ्या जालना जिल्ह्यातील सराईत घरफोडी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. पोलिसांनी या कारवाईत तीन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली डस्टर कार, पल्सर मोटारसायकल आणि सोन्याचे दागीने असा एकूण १७ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबतची हकीगत अशी की, २५ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी सव्वाएक वाजण्याच्या सुमारास टाकळी ढोकेश्वर येथील खिलारी वस्तीवरील फिर्यादी श्रीमती मंगल संतोष गोरडे यांच्या घराचे अनोळखी तीन जणांनी कुलूप तोडून ३ लाख ९ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी विशेष पथkaची स्थापना करून त्यांना तपासासाठी रवाना केले.
तपास पथक गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे समांतर तपास करत असताना, हा गुन्हा कार्तिक प्रकाश आव्हाड (रा. घनसांगवी, जि. जालना) याने आपल्या इतर साथीदारांसह केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. पथकाने तातडीने जालना जिल्ह्यात जाऊन मुख्य आरोपी कार्तिक प्रकाश आव्हाड (वय २०) यास ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने आपल्या अन्य साथीदारांच्या मदतीने डस्टर कार व पल्सर मोटारसायकलवर येऊन ही घरफोडी केल्याची कबुली दिली.
या प्रकरणी पोलिसांनी गणेश प्रकाश आव्हाड (वय २०, रा. घनसांगवी, जि. जालना) आणि अभिषेक उर्फ अभि प्रकाश लोमटे (वय २१, रा. कळंब, जि. धाराशिव) यांनाही ताब्यात घेतले आहे. तर या गुन्ह्यातील इतर आरोपी अर्जुन गणपत गायकवाड, पुजा प्रकाश आव्हाड (दोघे रा. घनसांगवी, जि. जालना) आणि सुमित विनायक पांजगे (रा. मांगवाडा, घनसांगवी) हे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली ८ लाख रुपये किमतीची रेनॉल्ट कंपनीची डस्टर कार, १ लाख रुपये किमतीची पल्सर मोटारसायकल आणि ८ लाख ४० हजार रुपये किमतीचे ६० ग्रॅम वजनाचे सोने असा एकूण १७ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना मुद्रेमालासह पारनेर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून, पुढील तपास पारनेर पोलीस करीत आहेत.
सदर धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड, अनंत सालगुडे आणि पथकातील पोलीस अंमलदारांनी पार पाडली आहे.







