कोल्हापुरात देशभूषण हायस्कूल परिसरामध्ये कचऱ्याचे साम्राज्य; विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात

देशभूषण हायस्कूल

कोल्हापूर (प्रतिनिधी रहिम पिंजारी) | येथील सोमवार पेठ भागात असलेल्या देशभूषण हायस्कूलच्या भिंतीला लागून मोठ्या प्रमाणात घाण, कचरा आणि झाडी-झुडपे वाढली आहेत. यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले असून पालकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. या संदर्भात ‘राजे फाउंडेशन’चे संस्थापक रियाज जैनापुरे यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना, स्थानिक मुकादमांना आणि त्यांच्या वरिष्ठांना अनेक वेळा लेखी व तोंडी स्वरूपात कळवले आहे. मात्र, महापालिका प्रशासनाकडून या गंभीर समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

 

सध्या या परिसरात साचलेल्या कचऱ्यामुळे डास आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून, विद्यार्थ्यांना विविध साथीच्या आजारांची लागण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. “जर या कचऱ्यामुळे विद्यार्थ्यांना काही आजार झाला, तर याला जबाबदार कोण?” असा संतप्त प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे. महापालिकेच्या स्थानिक अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे आता या प्रकरणात थेट महानगरपालिका आयुक्तांनीच लक्ष घालणे गरजेचे झाले आहे. आयुक्तांनी तात्काळ आदेश देऊन हा शालेय परिसर स्वच्छ करावा, अशी आग्रही मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून आणि स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

 देशभूषण हायस्कूल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here