कोल्हापुरात घरफोडीचा गुन्हा अवघ्या २४ तासांत उघड; पार्सल डिलिव्हरी बॉय गजाआड

पार्सल डिलिव्हरी

कोल्हापूर (प्रतिनिधी रहिम पिंजारी) | घरपोच ऑनलाईन पार्सल डिलिव्हरी करणाऱ्या एका तरुणाने बंद तिजोरी फोडून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात उघडकीस आली आहे. जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अत्यंत कौशल्याने आणि वेगाने तपास करत अवघ्या २४ तासांच्या आत या घरफोडीचा छडा लावून आरोपीला बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून तब्बल १६ लाख ६८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

सोहेल समीर शेख (वय २८, मूळ रा. प्रगतीशील तरुण मंडळाजवळ, न्यू नाना पेठ, पुणे; सध्या रा. लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर) असे अटक करण्यात आलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी शुभदा सुरेश मंडलिक (वय ६३, रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर) यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

फिर्यादी शुभदा मंडलिक यांचे घर उघडे असल्याचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला होता. घरातील तिजोरीतून ६ तोळे वजनाच्या सोन्याच्या पाटल्या आणि ५ तोळे वजनाचे गंठण असा एकूण १६ लाख २६ हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला होता. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अतिश म्हेत्रे व पथकाने घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजची सूक्ष्म पाहणी केली. दरम्यान, पूर्वी पार्सल डिलिव्हरीचे काम करणाऱ्या सोहेल शेख यानेच ही चोरी केली असून तो दागिने विक्रीसाठी अंबाई टँक परिसरात येणार असल्याची पक्की माहिती खबऱ्यामार्फत मिळाली. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता अंबाई टँक येथे सापळा रचला. पांढऱ्या रंगाच्या मोपेडवरून आलेल्या संशयित सोहेल शेखला ताब्यात घेऊन गाडीच्या डिकीची तपासणी केली असता, रुमालात बांधून ठेवलेले चोरीचे सोन्याचे दागिने मिळून आले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

त्याच्याजवळून ६ तोळे २६० मिग्रॅ सोन्याच्या पाटल्या (किंमत ₹ ८,८८,०००/-), ५ तोळे ४६० मिग्रॅ सोन्याचे गंठण (किंमत ₹ ७,४०,०००/-), गुन्ह्यात वापरलेली ॲक्टिव्हा मोपेड (किंमत ₹ ४०,०००/-), असा एकूण १६,६८,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेला सोहेल शेख हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी पुणे शहरातील समर्थ पोलीस ठाण्यात घरफोडी व चोरीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

ही यशस्वी कारवाई कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव, गृह विभागाच्या पोलीस उपअधीक्षक श्रीमती प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे, उपनिरीक्षक अतिश म्हेत्रे व त्यांच्या गुन्हे शोध पथकाने केली. २४ तासांत गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here