अवैध वाळू वाहतुकीचा पाठलाग करणाऱ्या संपादकाला वाळू माफियांचा मारहाणीचा प्रयत्न

वाळू माफिया

जळगाव पोलीस अधीक्षकांकडे ‘बुलंद पोलिस टाईम्स‘च्या संपादकांची तक्रार; संरक्षणाची मागणी

जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर शरद चव्हाण) |एरंडोल महामार्गावरून होणाऱ्या अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी पाठलाग करणारे ‘बुलंद पोलिस टाईम्स’चे मुख्य संपादक सुनिल शिवदास पाटील यांच्यावर वाळू माफियांनी लाठ्या-काठ्यांसह जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवाने संपादक पाटील यांनी तत्परता दाखवल्याने ते बालंबाल वाचले. मात्र, या प्रकरणाचा संशय घेऊन संबंधित वाळू माफियांनी दुसऱ्या दिवशी स्थानिक पत्रकार विनोद पाटील यांना बेदम मारहाण केली. या प्रकरणी मुख्य संपादक सुनिल पाटील यांनी जळगावचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून आपल्या व कुटुंबीयांच्या जीवितास धोका असल्याचे सांगत संरक्षणाची मागणी केली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार १६ ऑक्टोबर रोजी रात्री ९ ते १० वाजेच्या सुमारास संपादक सुनिल पाटील हे एरंडोल येथून येत असताना राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर त्यांच्या वाहनासमोरून दोन वाळूने भरलेले डंपर भरधाव वेगात जाताना दिसले. त्यांनी तात्काळ या प्रकाराबाबत एरंडोल तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व नायब तहसीलदार (महसूल) यांना दूरध्वनीवरून माहिती देण्याचा प्रयत्न केला. पोलीस निरीक्षकांनी फोन उचलला नाही, तर तहसीलदार यांनी घटनास्थळी मंडळ अधिकाऱ्यांना पाठवले.

अधिकारी घटनास्थळी पोहोचण्यास विलंब होत असल्याने संपादक स्वतः त्या डंपरचा पाठलाग करत राहिले. दरम्यान, पाठलाग होत असल्याचा संशय आल्याने डंपर चालकांनी पिंप्री बुद्रुक हद्दीतील सबस्टेशनजवळ गाड्या थांबवल्या. डंपर चालकांसह सुमारे ४ ते ५ जण लाठ्या-काठ्या घेऊन वाहनाच्या दिशेने धावून आले. वाहनाच्या दिव्यांच्या उजेडात वाळू माफिया ईश्वर बंडू पाटील, भूषण पाटील, अजय ईश्वर पाटील हे तिघे स्पष्टपणे ओळखू आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून संपादक पाटील यांनी तात्काळ वाहन मागे वळवून पाळधी पोलीस ठाणे गाठले, ज्यामुळे पुढील अनर्थ टळला.

या घटनेनंतर, संपादकांना ही माहिती स्थानिक पत्रकार विनोद पाटील यांनी दिली असल्याचा संशय घेत, वाळू माफियांनी दुसऱ्या दिवशी (१७ ऑक्टोबर) पत्रकार विनोद पाटील यांना गाठून बेदम मारहाण केली. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकाराची विनोद पाटील यांना कोणतीही पूर्वकल्पना नव्हती.

वाळू माफिया ईश्वर बंडू पाटील (रा. पिंप्री बु.) व त्यांच्या साथीदारांपासून स्वतःच्या तसेच कुटुंबाच्या जिवाला गंभीर धोका निर्माण झाल्याचे सांगत, सुनिल पाटील यांनी जळगाव पोलीस अधीक्षकांकडे तक्रार अर्ज सादर केला आहे. या अर्जाची प्रत पोलीस महासंचालक (महाराष्ट्र राज्य) आणि नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनाही पाठविण्यात आली असून, संबंधित समाजकंटकांवर कठोर कारवाई करून पोलीस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here