कोल्हापुरात नवरात्रोत्सवाच्या आरतीवरून राडा; राजारामपुरीत रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार करणाऱ्या मंडळाच्या अध्यक्षाला अटक

रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार

कोल्हापूर (प्रतिनिधी रहिम पिंजारी) | कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या दत्त गल्ली शाहूपुरी परिसरात नवरात्रोत्सवाच्या आरतीवरून झालेल्या वादातून एका मंडळाच्या अध्यक्षाने आपल्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी अध्यक्षाला अटक केली असून गुन्ह्यात वापरलेले शस्त्र जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

 

विजयकुमार शंकरराव पाटील (वय ५९ वर्ष, रा. मालती अपार्टमेंट, प्रतिभा नगर, कोल्हापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सुधीर दत्तात्रय खेबुडे (वय ३६ वर्ष, रा. दत्तगल्ली शाहूनगर, राजारामपुरी, कोल्हापूर) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजारामपुरी येथील दत्त गल्ली शाहूनगर परिसरात ‘राजश्री शाहू फ्रेंड सर्कल’ नावाचे मंडळ आहे. या मंडळाने नवरात्रोत्सवामध्ये देवीची स्थापना केली आहे. उत्सव काळात देवीच्या आरतीला एकमेकांना बोलावणे आणि मानपान देण्यावरून मंडळाचे कार्यकर्ते सुधीर खेबुडे आणि सिद्धेश थोरवत यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला होता. हा वाद मिटवण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष विजयकुमार पाटील आणि प्रतिभा नगरचे रहिवासी मध्यस्थी करत होते.

याच वादाचा राग मनात धरून १४ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे २:०० ते २:३० वाजण्याच्या सुमारास सुधीर खेबुडे, त्यांचे भाऊ किरण खेबुडे आणि मंडळाचे इतर कार्यकर्ते एकत्र बसून चर्चा करत होते. यावेळी तिथे आलेल्या विजयकुमार पाटील यांना कार्यकर्त्यांनी पाहून अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पाटील यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी स्वतःच्या कमरेला असलेली परवानाधारक रिव्हॉल्व्हर बाहेर काढली. कार्यकर्त्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता, झालेल्या झटापटीत पाटील यांच्याकडून रिव्हॉल्व्हरमधून एक राउंड जमिनीच्या दिशेने फायर झाला. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही.

या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. सुधीर खेबुडे यांच्या तक्रारीवरून राजारामपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी अध्यक्ष विजयकुमार पाटील याला तात्काळ अटक केली आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेली रिव्हॉल्व्हर जप्त करण्याची तजवीज ठेवली आहे.

या घटनेचा पुढील तपास कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक श्री. अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. विकास जाधव, उपनिरीक्षक श्री. रुपेश इंगळे आणि पोलीस अंमलदार करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here