हातचलाखीने वयोवृद्धांची फसवणूक करणारा सराईत भामटा उल्हासनगर गुन्हे शाखेकडून जेरबंद; २४ लाखांचे सोने जप्त

उल्हासनगर गुन्हे

ठाणे (सहसंपादक लक्ष्मीनारायण वन्नम) | ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांना जुनी ओळख असल्याचे भासवून, बोलण्यात गुंतवून त्यांचे दागिने व रोख रक्कम हातचलाकीने लांबवणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला उल्हासनगर गुन्हे शाखा घटक-४ च्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. दिनेश बाबू मंचेकर (वय ३७, रा. महापे, नवी मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या कारवाईमुळे ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई परिसरातील तब्बल १७ गुन्हे उघडकीस आले असून, पोलिसांनी आरोपीकडून २४ लाख २४ हजार रुपये किमतीचे २१२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

 

मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्याचा समांतर तपास उल्हासनगर गुन्हे शाखा घटक-४ कडून सुरू होता. यादरम्यान पोलीस हवालदार गणेश गावडे यांना मिळालेली गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी नवी मुंबईतील महापे परिसरात सापळा रचून ५ ऑक्टोबर रोजी दिनेश मंचेकर याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपी दिनेश याने त्याचे साथीदार सुदेश उर्फ बाबु तानाजी महादे (वय ५५, रा. चिपळूण) आणि बाबु ईरप्पा मंचेकर (वय ६८, रा. पनवेल) यांच्या मदतीने हे गुन्हे केल्याची कबुली दिली.

हे भामटे सार्वजनिक ठिकाणी रस्त्याने जाणाऱ्या वयोवृद्ध महिला व पुरुषांना गाठायचे. ‘मी तुम्हाला ओळखतो’, असा बनाव रचून जुन्या आठवणी सांगत त्यांना विश्वासात घ्यायचे. त्यानंतर वेगवेगळ्या बतावण्या करून, बोलण्यात गुंतवून हातचलाकीने त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम काढून पोबारा करत असत. पोलीस कस्टडी दरम्यान झालेल्या सखोल तपासात बदलापूर पूर्व-पश्चिम, उल्हासनगर, महात्मा फुले चौक, शिवाजीनगर, पनवेल शहर आणि कोपरखैरणे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १७ गुन्हे उघडकीस आले आहेत. याशिवाय घाटकोपर पोलीस ठाण्यातील दोन गुन्ह्यांतही हा आरोपी हवा होता.

विशेष म्हणजे अटक करण्यात आलेला दिनेश मंचेकर हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी मुंबई, नवी मुंबई, मिरा-भायंदर आणि ठाणे शहरात चोरी, जबरी चोरी, फसवणूक आणि पोक्सोसारखे तब्बल २९ गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलीस आयुक्त आशुतोष डंबरे, सह पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, गुन्हे पोलीस उपआयुक्त अमरसिंग जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गज्जल, पोलीस उपनिरीक्षक अशोक पवार, हवालदार गणेश गावडे, राजेंद्र थोरवे, मंगेश जाधव, अमर कदम, अशोक थोरवे, सतिश सपकाळे, रितेश वंजारी, चंद्रकांत सावंत, प्रकाश पाटील, संजय शेरमाळे आणि अविनाश पवार यांच्या पथकाने ही कौतुकास्पद कारवाई केली. या प्रकरणातील फरार साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here