बगीरथी नगर ते मंगेशी ड्रीम सिटी पाणीपुरवठा पाईपलाईन कामाचे भूमिपूजन संपन्न; आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पाठपुराव्याला यश; परिसरातील पाणीप्रश्न मिटणार

आमदार विश्वनाथ भोईर

कल्याण (ऑल इंडिया क्राइम रिपोर्टर बाळू पाटील) | नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रात विकासाचे आणखी एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे. कल्याण पश्चिमचे आमदार श्री. विश्वनाथ भोईर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून बगीरथी नगर (साकेत) ते मंगेशी ड्रीम सिटी या परिसरासाठी मंजूर झालेल्या नव्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन टाकण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न झाला.

पाणी ही प्रत्येक नागरिकाची अत्यावश्यक गरज असल्याने परिसरातील नागरिकांना नियमित, पुरेसा आणि सुरळीत पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी ही पाईपलाईन अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या प्रकल्पामुळे बगीरथी नगर, मंगेशी ड्रीम सिटी तसेच लगतच्या परिसरातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, वर्षानुवर्षे जाणवणारी पाण्याची समस्या कायमस्वरूपी मार्गी लागण्यास मदत होईल.
“केवळ रस्ते आणि इमारती उभारणे म्हणजे विकास नव्हे, तर नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी, स्वच्छता, आरोग्य आणि इतर पायाभूत सुविधा सक्षम करणे हीच विकासाची खरी ओळख आहे,” असे मत या वेळी व्यक्त करण्यात आले. नागरिकांच्या दैनंदिन समस्या सोडवण्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन अशाच प्रकारची लोकहिताची कामे अविरत सुरू ठेवण्याचा संकल्पही या वेळी व्यक्त करण्यात आला.
या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी नगरसेवक श्री. वरूण पाटील, श्री. जयवंत भोईर, नगरसेविका सौ. सुप्रिया भोईर, शिवसेना उपशहरप्रमुख श्री. सुनील खारूक, युवासेना जिल्हा चिटणीस श्री. वैभव भोईर, शाखाप्रमुख श्री. प्रतीक चौधरी, उपविभागप्रमुख श्री. अर्जुन दिवेकर, श्री. प्रशांत पाटील, श्री. अनिकेत वायले, श्री. महेश जाधव यांच्यासह परिसरातील विविध सोसायट्यांचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here