भुईंज परिसराला डेंग्यूसदृश आजाराचा विळखा; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; बदेवाडी, देगाव, भिरडाचीवाडीसह अनेक गावांत घरोघरी रुग्ण

भुईंज

सातारा (जिल्हा प्रतिनिधी संजय भोसले) | वाई तालुक्यातील भुईंज परिसरासह लगतच्या गावांमध्ये डेंग्यूसदृश संसर्गजन्य आजाराने डोके वर काढले असून मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत आहेत. अचानक वाढलेल्या या साथीच्या आजारामुळे संपूर्ण परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भुईंज परिसरासह बदेवाडी, देगाव, भिरडाचीवाडी, चाहूर, मालदेवाडी यांसारख्या अनेक गावांमध्ये थंडी-तापाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. रुग्णांना सुरुवातीला तीव्र थंडी वाजून ताप येणे, अंगदुखी अशी लक्षणे जाणवत असून, प्राथमिक तपासणीत डेंग्यूसदृश लक्षणे आढळत असल्याने रुग्णांसह नातेवाईकांचे धाबे दणाणले आहेत. सध्या स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय तसेच खासगी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी रुग्णांची गर्दी दिसून येत आहे.
वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सरकारी तसेच खासगी वैद्यकीय यंत्रणा रुग्णांवर तातडीने योग्य उपचार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. आरोग्य विभागाकडून या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.
दरम्यान, वाढती साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने गावागावांत जंतुनाशक औषध फवारणी करावी, साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावून डासांचा प्रादुर्भाव रोखावा आणि तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत विशेष तपासणी शिबिरे राबवावीत, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे. घरोघरी आजारी असणाऱ्या रुग्णांवर वेळेत व योग्य उपचार व्हावेत, अशी अपेक्षा या भागातील नागरिक व्यक्त करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here