ऊसतोड कामगारांच्या कुटुंबीयांसोबत ग्रामविकास प्रतिष्ठानने साजरी केली दिवाळी; ९० कुटुंबांना स्नेहभेट

ग्रामविकास प्रतिष्ठान

इंदापूर (प्रतिनिधी गणेश धनवडे) | ऊसतोड कामगारांचे ऊस शेती आणि साखर उद्योगातील योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या कष्टाचा सन्मान करत त्यांच्या कुटुंबीयांसोबत दिवाळीचा आनंद वाटून घेण्याच्या उद्देशाने इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारी (दि. ७) निमसाखर ता. इंदापूर येथे दिवाळीपूर्व स्नेहभेट उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

संस्थेचे सचिव वीरसिंह रणसिंग यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. ऊसतोड कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद फुलविणे, तसेच त्यांच्या श्रमाप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हा या उपक्रमामागील मुख्य हेतू होता.
या उपक्रमांतर्गत उपस्थित ९० ऊसतोड कामगार कुटुंबांना इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आनंदी रणसिंग आणि विश्वस्त सौ. राही रणसिंग यांच्या हस्ते उटणे, शिकेकाई, अत्तर आणि दिवाळीचा फराळ स्नेहभेट म्हणून देण्यात आला. सणाच्या निमित्ताने मिळालेल्या या भेटीमुळे कामगार कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
ऊसतोड कामगारांच्या घामातून साखर उद्योगाची चाके फिरतात. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांच्या आनंदाचा विचार अनेकदा दुर्लक्षित राहतो.अशा परिस्थितीत प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकी जपत राबविलेला हा उपक्रम कौतुकास्पद ठरला.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक काळंगे, उपप्राचार्य प्रा.ज्ञानेश्वर गुळीग,डॉ.प्रशांत शिंदे,प्रा. राजेंद्रकुमार डांगे,डॉ.तेजश्री हुंबे,डॉ.योगेश खरात,प्रा. ज्ञानेश गवळी,डॉ.बबन साळवे,प्रा.सोनाली चव्हाण, प्रा. सुजाता निंबाळकर,प्रा.नितीन रुपनवर,प्रा. अभिजीत शिंगाडे,सुभाष भंडलकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here