सातारा (उपसंपादक लव चव्हाण) | मौजे गणेशवाडी तालुका खटाव येथे सद्गुरू संत बाळुमामा यांचा जन्म उत्सव सोहळा व रथ सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गणेशवाडी येथे २००९ साली भाविक भक्तांच्या वर्गणीतून बांधण्यात आलेल्या मामांच्या मंदिर परिसरात दरदिवशी पुजा आरती मंदिर पुजारी मंडळी यांच्या हस्ते करण्यात येते. दर अमावस्या, पोर्णिमा या दिवशी ही पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्त मामांच्या दर्शनासाठी गर्दी करत असतात.
भाविक भक्तांच्या वाढता प्रतिसाद पाहून चालु वर्षी मंदिर कमेटी व गणेशवाडी ग्रामस्थ यांच्या वतीने सद्गुरु संत बाळुमामा यांच्या जन्म उत्सवाचे नेटके नियोजन करण्यात आले होते.गुरुवार दिनांक २२ आँक्टोबर रोजी सायंकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत गणेशवाडी भजन मंडळाचा हरिपाठ, सायंकाळी ७ ते ९ या वेळेत सोनी मराठी फेम स्वरभूषण ह.भ.प. आकाश महाराज गरगडे फलटण यांचे सुश्राव्य कीर्तन, रात्री ९ वाजता आरती व मंदिर कमेटी तर्फे महाप्रसाद वाटप करण्यात आला. शुक्रवार दिनांक २३ आँक्टोबर रोजी मुख्य दिवशी पहाटे ५ वाजता मामांच्या मूर्तीला अभिषेक, सकाळी ८ वाजता दुधाने कलशा अभिषेक, सकाळी ९ वाजता आरती, दुपारी २ ते ४.२० गणेशवाडी भजन मंडळाचा भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.दुपारी ४.२३ मिनिटांनी फुलांचा कार्यक्रम व मामांचा पाळणा हा मुख्य कार्यक्रम साजरा करण्यात आला. सायकाळी ४.४५ वाजल्यापासून बाळूमामा च्या रथाची गावातून भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणुकीत गणेशवाडी- करमारवाडी येथील युवकांनी व नागरिकांनी आकर्षक व लय बद्ध गजी नृत्याचा कार्यक्रम साजरा करून रथ उत्सव सोहळ्यात वेगळी रंगत आणली तर या वेळी गावातील चौका चौकात व मुख्य ठिकाण फटाक्यांची आतषबाजी करण्यात येत होती.तर भावीक व गावकरी भंडार्याची उधळण करीत बाळु मामांच्या नावाने चांगभलं अश्या नावाने संत बाळु मामांचा जय घोष करीत होते.
रात्री ८ ते ८.३० पर्यंत मंदिराच्या परिसरात गजी नृत्याचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.बरोबर ८.३० वाजता रथ ग्रामप्रदशना पुर्ण करून मंदिराजवळ आणण्यात आला. नंतर रथातून मामांच्या पादुका व फोटो ढोल कैताळाच्या निनादात मंदिरात आणण्यात आला. तदनंतर मंदिरातील पुजारी मंडळी व सेवेकरी मंडळी यांच्या वतीने मंदिरात धुप आरती करण्यात आली.तदनंतर गणेशवाडी येथील नागरिक श्री. बाळासाहेब साहेबराव वावरे व सहपरिवार यांच्या शुभहस्ते महाआरती संपन्न झाली.दरम्यान आरती वेळी व आरती नंतर गणेशवाडी येथील सुवासिनी महिलांनी मामांच्या मंदिरात दिवे ओवाळून भक्ती भावाने मामांची पुजा अर्चा केली.
आरती संपन्न झाल्यानंतर बाळासाहेब साहेबराव वावरे व सहपरिवार यांच्या वतीने जन्म उत्सव सोहळ्या निमित्त महाप्रसादाचे वाटप उपस्थित सर्व भाविकांना मनोभावे करण्यात आले. यावेळी गणेशवाडी येथे युवा तरुण वर्गाची व पुरुष मंडळी यांच्या महाप्रसादाचे वाटप करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होती.यावेळी माधवनगर येथील शाहिर रामभाऊ भोसले व सहकारी यांचा धनगरी ओवी गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ओवी गायनाच्या कार्यक्रमांचा उपस्थित भाविक भक्तांनी मनसोक्त आनंद घेतला व ओवीकार मंडळींच्या कलेला दाद दिली.
गणेशवाडी या ठिकाणी दोन दिवस चाललेल्या मामांच्या जन्म उत्सव सोहळ्या साठी राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक क्षेत्रातील व भाविक भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित दर्शवली. हा सोहळा उत्साहात साजरा करण्यासाठी गावातील युवकांनी, पुरुष मंडळी, महिला मंडळींनी मंदिर सेवेकरी मंडळी यांनी विशेष परिश्रम घेतले.







