सातारा (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्टर जगदीश शिंदे) | सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटलच्या अपघात विभागासमोर मारामारी सुरू असताना संबंधितांना अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांनाच मारहाण करण्यात आली. ही घटना २७ तारखेला संध्याकाळी सातच्या सुमारास घडली. या प्रकरणी शासकीय कामात व कर्तव्य पार पाडताना अडथळा आणल्याप्रकरणी सात जणांसह एका अनोळखी मुलाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अनिकेत यशवंत बनकर (वय २६) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अपघात विभागासमोर काही जण एका व्यक्तीला मारहाण करत होते. त्यावेळी पोलीस कॉन्स्टेबल अनिकेत बनकर व महिला पोलीस कॉन्स्टेबल घारगे यांनी मध्यस्थी करत मारहाण करू नका, असे सांगून त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. याचा राग आल्याने संशयितांनी पोलिसांच्या अंगावर धावून जात त्यांना हाताने व काठीने मारहाण केली.
याप्रकरणी उत्कर्ष रेपाळ. आदिती उत्कर्ष रेपाळ (वय २३), आदित्य उत्कर्ष रेपाळ, तेजस खंडू लवटे, आर्यन तुपे, जे एस शिंदे, अंकुर उत्कर्ष रेपाळ, एक अनोळखी मुलगा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बिले करत आहेत.







