ठाणे (उपसंपादक नामदेव पाटील) | एस.टी. महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाची बॅग चोरून त्यात असलेले सोन्याचे दागिने लांबवणाऱ्या चोरट्याला टोकावडे पोलिसांनी अवघ्या १२ तासांच्या आत जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी चोराकडून २ लाख ५ हजार रुपयांचा संपूर्ण चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करून महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.
फिर्यादी उल्हास नारायण काळे (रा. विटावा, कळवा) हे आपल्या पत्नीसह कल्याण ते जांबूत या एस.टी. बसने प्रवास करत होते. दि. ०३ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ३:३० ते ३:५० वाજના सुमारास त्यांची बस साई दीप हॉटेल, टोकावडे येथे थांबली असता, फिर्यादी यांनी बॅगेमध्ये ठेवलेले २,०५,००० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असलेली बॅग चोरट्याने लांबवली. याबाबत फिर्यादी यांनी टोकावडे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल, उपविभागीय पोलीस अधिकारी मुरबाड विभाग (शहापूर विभाग पदभार) विशाल नागरगोजे आणि टोकावडे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि शितलकुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तातडीने तपासाची चक्रे हलवली.
पोउपनि जयवंत वारा, पोहवा एन. जे. चौधरी, बी. टी. पारधी, जे. एन. पठारे, पोशि अशोक धापटे, एम. जे. अहिरे आणि पथकाने उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषकाच्या आधारे कसून तपास केला. अवघ्या १२ तासांत गुन्हा उघडकीस आणत आरोपी हनुमंत दामू पवार (रा. कामतपाडा, खापरी, ता. मुरबाड) यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून २,००,००० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व ५,००० रुपये रोख रक्कम असा सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जयवंत वारा करत आहेत.







