नाशिक (उपसंपादक इंजि कुबेर जाधव) | आंतरराष्ट्रीय संस्था असलेल्या ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या वतीने उत्तर महाराष्ट्रातील साधकांसाठी मांगीतुंगी येथील अतिशय निसर्गरम्य परिसरात चार दिवसीय भव्य ‘अँडव्हान्स मेडिटेशन प्रोग्राम’ (उन्नत ध्यान शिबिर) अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या शिबिरात तब्बल १२२ आर्ट ऑफ लिव्हिंगच्या साधकांनी सहभाग घेत चार दिवस योग साधना, पद्म साधना, दीर्घकाळ मौन प्रक्रिया, सेवा, अध्यात्म आणि सत्संगाचा लाभ घेतला.
ज्ञान, विज्ञान आणि अध्यात्म यांची सुरेख सांगड घालत साधकांना अंतर्मुख करण्याची या शिबिराची रचना होती. विशेषतः, सलग तीन दिवसांच्या अखंड मौनामध्ये साधक अंतर्मुख होऊन ध्यानाच्या आनंदात तल्लीन झाले होते.
नाशिक परिमंडलाचे आर्ट ऑफ लिव्हिंगचे चिप आणि ॲडव्हान्स मेडिटेशनचे ज्येष्ठ प्रशिक्षक श्रीमान विजयजी हाके आणि ‘दिव्य समाज निर्माण’ या निवासी कोर्सचे प्रशिक्षक श्रीमान चंद्रकांतजी ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व कुशल प्रशिक्षणाखाली हा संपूर्ण कार्यक्रम पार पडला. मांगीतुंगी येथे अशा प्रकारचे उच्चस्तरीय शिबिर झाल्यामुळे बागलाणवासीयांना एक सुखद आश्चर्य व आध्यात्मिक अनुभूती मिळाल्याचे आर्ट ऑफ लिव्हिंगचे आद्य स्वयंसेवक कुबेर जाधव यांनी सांगितले.
संपूर्ण बागलाण आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारातील सर्व प्रशिक्षक व स्वयंसेवकांनी अतोनात मेहनत घेऊन हा कोर्स यशस्वी केला. यात प्रामुख्याने सागर आहेर, चेतन बागुल, उमेशजी, अनुप पटेल, संतोष, अतुल, कविता जाधव व युवा प्रशिक्षकांनी मोलाची कामगिरी बजावली.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल मुख्य प्रशिक्षक मा. विजयजी हाके व चंद्रकांतजी ठाकूर यांनी सर्व प्रशिक्षक, स्वयंसेवकांसह मांगीतुंगी देवस्थान ट्रस्टचे अधिकारी व कर्मचारी यांनी दिलेल्या अप्रतिम सेवा योगदानाबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. शिबिराच्या साठाव्या आणि समाप्ती सोहळ्याने सर्व साधकांमध्ये एक नवी ऊर्जा व सकारात्मकता निर्माण केली आहे.







