धिंड प्रकरणी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्या; पोलीस मित्र सोशल फाउंडेशनचे सोलापूर पोलीस आयुक्तांना निवेदन

पोलीस मित्र सोशल

पंढरपूर (तालुका रिपोर्टर प्रकाश इंगोले) | पुणे येथील एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींची धिंड काढून त्यांना मारहाण करणे तसेच अल्पवयीन मुलांना पोलीस व्हॅनच्या बोनेटवर बसवून फिरवल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह १३ पोलिसांवर दाखल करण्यात आलेले गंभीर गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत, अशी मागणी ‘पोलीस मित्र सोशल फाउंडेशन’च्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत संस्थेच्या वतीने सोलापूर पोलीस आयुक्तांना अधिकृत निवेदन सादर करण्यात आले आहे.

 

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५ ते ९ जुलै दरम्यान घडलेल्या या प्रकरणाची राज्य मानवी हक्क आयोगाच्या आदेशानुसार ‘सीआयडी’मार्फत चौकशी करण्यात आली. त्यानुसार तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, उपनिरीक्षक आण्णा मधुकर दराडे, नीलेश राजेंद्र मोकाशी, फकीर, हवालदार सुनील हनवते, अंमलदार सागर चंद्रकांत बोरगे, सोहम कैलास शेंडकर, राहुल अशोक ओंधकर, मितेश दत्तात्रेय चोरमोले, रवींद्र शंकर गायकवाड, संदीप लक्ष्मण आगळे, तसेच अंमलदार सुतार व पवार यांच्यावर सीआयडीचे पोलीस उपअधीक्षक संकेत सतीश गोसावी यांच्या फिर्यादीवरून अॅट्रॉसिटी कायद्यासह विविध कलमांखाली दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या कारवाईमुळे संपूर्ण पोलीस दलात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली असून, राज्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोबल यामुळे खचले आहे. तसेच पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून असुरक्षिततेची भावना वाढीस लागल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. आरोपींची धिंड काढल्याप्रकरणी थेट पोलिसांवरच गुन्हे दाखल झाल्याने तपास यंत्रणेवरही गंभीर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.

या संपूर्ण प्रकरणाबाबत सोलापूर पोलीस आयुक्तांनी जातीने लक्ष घालावे आणि अल्पवयीन मुलांची धिंड काढल्याप्रकरणी संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, अशी आक्रमक मागणी पोलीस मित्र सोशल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे. यापूर्वी याच मागमीसाठी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन सादर करण्यात आले होते.

यावेळी पोलीस मित्र सोशल फाउंडेशनचे संस्थापक यशवंत पवार, जिल्हाध्यक्ष राजू वग्गू, उपाध्यक्ष लक्ष्मण सुरवसे, सोलापूर शहर कार्यकारी शहराध्यक्ष बसवराज हमाले, उपाध्यक्ष रमेश दग्गारी, जैद बागवान, सुफी शेख, व्यंकटेश सुंचू आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here