पंढरपूर (तालुका रिपोर्टर प्रकाश इंगोले) | सोलापूर ग्रामीण हद्दीत शरीराविरुद्ध व मालाविषयक गंभीर स्वरूपाचे गुन्हे सतत करणाऱ्या तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत पसरवणाऱ्या शरद विठ्ठल कोळी (रा. अर्धनारी, ता. मोहोळ, जि. सोलापूर) या सराईत गुन्हेगाराविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार M.P.D.A. (स्थानिक गुन्हेगारी प्रतिबंधक) कायद्यान्वये कठोर कारवाई करण्यात आली आहे. त्याला पुणे येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
आरोपी शरद कोळी याच्यावर सोलापूर जिल्ह्यासह नांदेड व जळगाव जिल्ह्यात खून करण्याचा प्रयत्न करणे, खंडणी मागणे, घातक हत्याराचा वापर करून दुखापत पोहोचवणे, जबर चोरी करणे यांसारखे गंभीर स्वरूपाचे एकूण ०९ गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर यापूर्वी कायदेशीर व प्रतिबंधक कारवाई म्हणून हद्दपार करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही त्याने पुन्हा गुन्हेगारी कृत्य करून सर्वसामान्यांमध्ये दहशत निर्माण करत सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधक ठरणाऱ्या गोष्टी सुरूच ठेवल्या होत्या.
त्याच्या वाढत्या गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. अतुल वि. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लवर यांनी एम.पी.डी.ए. कायद्यान्वये प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे सादर केला होता.
सोलापूरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी श्री. कार्तिकेयन यांनी सदर प्रस्तावाची पडताळणी करून शरद कोळी यास M.P.D.A. कायद्यान्वये स्थानबद्ध करण्याचे आदेश निर्गमजित केले होते. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्री. विजय शिंदे व पथकाने सांगली जिल्ह्यातून आरोपीस ताब्यात घेतले. पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यास पुढील स्थानबद्धतेसाठी येरवडा कारागृहात जमा करण्यात आले आहे.
सोलापूर ग्रामीण हद्दीत वाळू तस्कर, अवैध दारू विक्रेते आणि सराईत गुन्हेगारांवर यापुढेही अशाच प्रकारची प्रभावी प्रतिबंधक व कायदेशीर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक अतुल वि. कुलकर्णी यांनी दिला आहे.







