माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या फार्महाऊसची ड्रोनद्वारे रेकी; राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे सखोल चौकशी व अतिरिक्त सुरक्षेची मागणी

माजी मंत्री एकनाथराव खडसे

जळगाव (संपादक सुनिल पाटील) | माजी मंत्री तथा विद्यमान विधानपरिषद आमदार एकनाथराव खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील फार्महाऊसची ड्रोनद्वारे संशयित रेकी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्हेगारांचा शोध लावावा आणि खडसे कुटुंबीयांना अतिरिक्त सुरक्षा प्रदान करण्यात यावी, अशी जोरदार मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात आज (सोमवार, ५ ऑक्टोबर) जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांना निवेदन सादर करण्यात आले असून, कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, गेल्या २८ सप्टेंबर रोजी रात्री मुक्ताईनगर येथील आमदार एकनाथराव खडसे यांच्या फार्महाऊसवर एका अज्ञात ड्रोनद्वारे निगराणी (रेकी) करण्यात आली. या प्रकाराची सुरक्षारक्षकांनी तातडीने दखल घेत आपल्या मोबाईलमध्ये त्याचे व्हिडिओ चित्रीकरण देखील करून ठेवले. याप्रकरणी आमदार एकनाथराव खडसे यांनी थेट पोलीस महासंचालकांकडे रीतसर तक्रार दाखल केली आहे. मात्र, अद्याप स्थानिक पातळीवर पोलीस अधीक्षकांना या तक्रारीची प्रत प्राप्त झालेली नाही, अशी माहिती समोर आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

या घटनेची गंभीर दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने आज ५ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात ड्रोनद्वारे करण्यात आलेल्या या संशयित रेकी प्रकरणाची तात्काळ व सखोल चौकशी करण्यात यावी. यामागील षडयंत्र समोर आणून दोषींना तात्काळ अटक करावी. आमदार एकनाथराव खडसे व त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना तातडीने अतिरिक्त सुरक्षा पुरवण्यात यावी. जर लवकरात लवकर या प्रकरणात ठोस कारवाई झाली नाही, तर येत्या काळात तीव्र स्वरूपात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी प्रशासनाला देण्यात आला.माजी मंत्री एकनाथराव खडसे

या शिष्टमंडळात आणि निवेदन सादर करताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रमोदबापु पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी, कार्याध्यक्ष राजुभाऊ मोरे, डॉ. संग्रामसिंग सूर्यवंशी, जिल्हा कार्यालय सरचिटणीस वाय. एस. महाजन, महानगर जिल्हा सरचिटणीस सुनील माळी, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मजहरभाई पठाण, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष रमेश बारे, युवक महानगर जिल्हाध्यक्ष विनायक पाटील, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष गौरव वाणी, महानगर अध्यक्ष गिरीश सांगळे, जिल्हा उपाध्यक्ष किरणभाऊ राजपूत, गणेशभाऊ पाटील, नईम खाटीक, रफीक पटेल यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रकरणाचा पोलीस प्रशासन कसा तपास करते आणि खडसे कुटुंबीयांच्या सुरक्षेबाबत काय निर्णय घेतला जातो, याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here