हवाल्याची ७.५२ लाखांची रोकड जप्त; शहर वाहतूक शाखेची कारवाई, दोन संशयितांना घेतले ताब्यात

शहर वाहतूक शाखेची कारवाई

जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर प्रमोद रुले) | अडावद (ता. चोपडा) येथून हवाल्याची रक्कम गोळा करून त्याद्वारे सोन्याची बिस्किटे खरेदी करण्यासाठी जाणाऱ्या दोन तरुणांना जळगाव शहर वाहतूक शाखेच्या पथकाने ममुराबाद रोडवर सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ७ लाख ५२ हजार १२० रुपयांच्या रोख रकमेसह बुलेट दुचाकी व मोबाईल असा एकूण १० लाख ९५ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. १६) दुपारी घडली असून, याप्रकरणी मंगळवारी (दि. १७) जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

शहर वाहतूक शाखेला सोमवारी गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, अडावद येथून दोघे जण हवाल्याची रक्कम गोळा करून त्यातून सोन्याची बिस्किटे खरेदी करून ती पार्सल करणार आहेत. या माहितीची खातरजमा करण्यासाठी वाहतूक शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल इम्रान रहीम बेग व मंगळ नथ्थू साळुंके यांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. दुपारी २.२० वाजेच्या सुमारास ममुराबाद रोडवरील वीटभट्टीजवळ संशयास्पदरीत्या येणाऱ्या काळ्या रंगाच्या बुलेट दुचाकीला (एमएच-१९-ईयू-१८८४) पथकाने थांबवले. चौकशीत दुचाकीचालक हरीश राजेंद्र महाजन (वय ३०) आणि मागे बसलेला सुजित गोकुळ महाजन (वय २६, दोघे रा. बालाजी मंदिराजवळ, अडावद, ता. चोपडा) अशी त्यांची नावे निष्पन्न झाली.

दोघांना शहर वाहतूक शाखेत आणून त्यांच्याकडील बॅग व अंगझडती घेतली असता मोठे घबाड हाती लागले. सुजित महाजन याच्या ताब्यातील बॅगेत १०० रुपये दराच्या ५ हजार नोटा (५ लाख रुपये) आणि ५०० रुपये दराच्या ५०० नोटा (२ लाख ५० हजार रुपये) अशी एकूण ७ लाख ५० हजार रुपयांची रोकड आढळून आली. तसेच अंगझडतीत सुजितकडे ६५ हजार रुपये किमतीचा आयफोन, तर हरीश महाजन याच्याकडे २ हजार १२० रुपये रोख व २८ हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल असा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी रोख रक्कम, दोन्ही मोबाईल आणि अडीच लाख रुपये किमतीची बुलेट असा एकूण १० लाख ९५ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त केला. श्रेणी पोलीस उपनिरीक्षक रहीम रज्जाक शेख यांनी पंचनामा केला असून, पोकॉ इम्रान बेग यांच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२४ अन्वये अदखलपात्र गुन्ह्याची (एनसी) नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक विजय निकम करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here