रांचीच्या राष्ट्रीय ट्रॅक सायकलिंग स्पर्धेत आकांक्षा म्हेत्रेला कांस्यपदक

आकांक्षा म्हेत्रे

एलिट वुमन टीम स्प्रिंटमध्ये १:१२.६२० वेळेची नोंद;
३९ व्या नॅशनल गेम्ससाठी महाराष्ट्र संघात निवड

जळगाव (संपादक सुनिल पाटील) | रांची (झारखंड) येथे झालेल्या राष्ट्रीय ट्रॅक सायकलिंग स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आकांक्षा म्हेत्रे ने उल्लेखनीय कामगिरी करत कांस्यपदक पटकावले. एलिट वुमन टीम स्प्रिंट या प्रकारात तिने १ मिनिट १२.६२० सेकंदांची वेळ नोंदवत पदकाला गवसणी घातली. आकांक्षा ही जैन इरिगेशनचे जी. एम. म्हेत्रे यांची कन्या आहे.

 

सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि झारखंड सायकलिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ३० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबरदरम्यान या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या फेरीत १० राज्यांच्या संघांनी सहभाग घेतला. त्यापैकी आठ संघांनी पात्रता फेरी पार करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. या अटीतटीच्या स्पर्धेत रेल्वे सर्व्हिसेस संघाने १:०९.९६६ वेळ नोंदवत सुवर्णपदक मिळवले, तर महाराष्ट्राच्या आकांक्षाने १:१२.६२० वेळेसह कांस्यपदकाची कमाई केली. झारखंडच्या संघाने १:१२.२५१ वेळ नोंदवली.

वैयक्तिक एक किलोमीटर टाइम ट्रायल प्रकारातही आकांक्षाने पहिल्याच प्रयत्नात १ मिनिट १८.०१ सेकंदांची वेळ नोंदवत अव्वल सहा खेळाडूंमध्ये स्थान मिळवले. या दमदार कामगिरीच्या जोरावर मेघालय येथे होणाऱ्या ३९ व्या नॅशनल गेम्समध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी तिला मिळाली आहे.

दरम्यान, १८ ते २१ नोव्हेंबरदरम्यान अमृतसर येथे होणाऱ्या आंतरविद्यापीठ ट्रॅक सायकलिंग स्पर्धेसाठी आकांक्षा सध्या बालेवाडी येथे कसून सराव करत आहे. राष्ट्रीय स्तरावर मिळवलेल्या या यशामुळे तिच्या पुढील वाटचालीसाठी नवी संधी निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here