जी.बी.एस. हॉलजवळ संशयित चारचाकी वाहन आढळल्याने खळबळ; भाजप पदाधिकाऱ्यांकडून ठाणे पोलीस आयुक्तांना निवेदन

जी.बी.एस. हॉल

ठाणे (सहसंपादक लक्ष्मीनारायण वन्नम) | अंबरनाथ परिसरातील जी.बी.एस. हॉलच्या खाली हत्यारे असल्याचा संशय असलेली एक चारचाकी गाडी आढळल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच चर्चा आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणावे, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट ठाणे पोलीस आयुक्तांची भेट घेऊन या प्रकरणी कठोर कारवाईसाठी लेखी निवेदन सादर केले आहे.

प्राप्त माहितीनुसार, अंबरनाथ येथील जी.बी.एस. हॉलच्या पार्किंग किंवा परिसराजवळ एक संशयित चारचाकी वाहन उभे असल्याचे निदर्शनास आले. या गाडीमध्ये हत्यारे असल्याची शंका वर्तवली जात असल्याने नागरिकांमध्ये आणि राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून या प्रकरणाची गंभीर दखल घेणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.

घटना गांभीर्याने घेत भाजपच्या शिष्टमंडळाने ठाणे पोलीस आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले. या निवेदनात संबंधित चारचाकी गाडीची कसून तपासणी करून त्यामध्ये नेमके काय आहे, याची कायदेशीर पडताळणी करण्यात यावी. हे वाहन नेमके कोणाच्या मालकीचे आहे आणि ते तेथे कोण व कोणत्या हेतूने घेऊन आले होते, याचा छडा लावला जावा. यामागे काही घातपाताचा किंवा गुन्हेगारी स्वरूपाचा उद्देश आहे का, याचा शोध घेऊन संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी. या घटनेचा पोलीस प्रशासन कसा तपास करते आणि यामागील सत्य काय बाहेर येते, याकडे आता अंबरनाथकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here