अवैध सावकारीविरोधात सहकार विभागाची धडक कारवाई; सोनके येथे चार जणांच्या घरांवर छापे

अवैध सावकारी

पंढरपूर (रिपोर्टर प्रकाश इंगोले) | पंढरपूर तालुक्यात दिवसेंदिवस डोके वर काढणाऱ्या अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी सहकार विभागाने आता अत्यंत कडक पावले उचलली असून, याच मोहिमेअंतर्गत तालुक्यातील सोनके येथे चार जणांच्या घरांची अचानक झडती घेण्यात आली आहे. जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) मुकुंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहायक निबंधक (सहकारी संस्था) सुनील तेलंगरे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

 

मौजे सोनके (ता. पंढरपूर) येथे महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम २०१४ च्या कलम १६ अन्वये ही धडक कारवाई पार पडली. या कारवाईदरम्यान सागर जनार्दन कोळेकर, सचिन मारुती पाटील (खरात), रणजित आजिनाथ कोळेकर आणि महेश गलांडे या सर्व सोनके येथील रहिवाशांच्या घरांची सखोल झडती घेण्यात आली. या विशेष मोहिमेत पथकप्रमुख पी. बी. सावंत, एस. एस. सांगोलकर, एस. एस. जाधव आणि ए. जी. जाधव यांच्या पथकाने सहभाग घेतला होता. घरझडतीदरम्यान मोठ्या प्रमाणावर संशयास्पद कागदपत्रे व नोंदी आढळून आल्या असून सध्या त्यांची कसून चौकशी व तपासणी सुरू आहे. या तपासणीतून उपलब्ध होणारे सबळ पुरावे आणि कागदपत्रांच्या आधारे संबंधितांवर कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती सहायक निबंधक सुनील तेलंगरे यांनी दिली आहे.

दरम्यान, पंढरपूर तालुक्यातील नागरिकांनी अवैध सावकारीसंदर्भात काही तक्रारी किंवा खात्रीशीर माहिती असल्यास न घाबरता तातडीने सहायक निबंधक, सहकारी संस्था, पंढरपूर या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही सहकार विभागाच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here