महिलेचे मंगळसूत्र हिसकावणारा चोरटा बार्शी पोलिसांच्या जाळ्यात; साथीदाराचा शोध सुरू

बार्शी पोलिसांच्या

२ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त; सोलापूर ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई

सोलापूर (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) | रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून येऊन जबरीने हिसकावून नेणाऱ्या आरोपीला बार्शी शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीकडून १ लाख ५० हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली ८० हजार रुपये किमतीची पल्सर दुचाकी असा एकूण २ लाख ३० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणातील दुसऱ्या साथीदाराचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

 

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विकास लक्ष्मण हिंगमिरे (वय ४६ वर्षे, रा. जुनी विडी घरकुल, सोलापूर) हे आपल्या पत्नीसह १७ ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास कासारवाडी रोड परिसरातून जात होते. त्यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोघा अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील २ लाख १० हजार ३९९ रुपये किमतीचे सुमारे ४८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पलायन केले होते. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून बार्शी शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०४(२), ३(५), २३८ अन्वये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन बार्शी शहर पोलिसांनी गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास चक्रे वेगाने फिरवली. या तपासात निष्पन्न झालेल्या माहितीवरून पोलिसांनी महादेव शंकर पवार (वय ३३ वर्षे, रा. महाळुंग, श्रीपूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून मंगळसूत्राचे तुकडे (वजन २८.६७० ग्रॅम) आणि सोन्याचे डोरले (५.६७० ग्रॅम) असे एकूण ३४.३४० ग्रॅम वजनाचे १ लाख ५० हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेली पल्सर मोटारसायकल जप्त केली.

दरम्यान, या गुन्ह्यातील त्याचा साथीदार विनोद गोविंद पिंपळे हा अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्याच्याकडून उर्वरित सोने हस्तगत करण्याची शक्यता असून आरोपींनी अशाच प्रकारचे इतर काही गुन्हे केले आहेत का, या दिशेनेही पोलीस तपास करत आहेत.

सदरची उल्लेखनीय कामगिरी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कुंभार, पोलीस उपनिरीक्षक अभयकुमार माकणे, पोलीस अंमलदार प्रवीण साठे, शबाना कोतवाल, धनराज फत्तेपूरे, प्रल्हाद अकुलवार, सचिन देशमुख, अंकुश जाधव, अजिज शेख, राहुल उदार, सचिन नितनाथ, अविनाश पवार, सतीश उघडे, दत्ता सोमवाड, सचिन राऊत, संतोष जाधवर, लक्ष्मण शेळके तसेच सायबर पोलीस ठाण्याचे राहुल सोनकर यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here