जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान; जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून हेक्टरी १ लाख मदतीची महाविकास आघाडीची मागणी

दुष्काळग्रस्त

जळगाव (संपादक सुनिल पाटील) | जिल्ह्यात यंदा अपुरा किंवा कमी पाऊस झाल्यामुळे शेतकरी वर्ग पूर्णपणे हवालदिल व अडचणीत आला आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्याला तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करून बाधित शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी १ लाख रुपये आर्थिक मदत देण्यात यावी, अशी ठळक मागणी महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. यासह देशात सुरु असलेल्या एस.आय.आर. (SIR) प्रक्रियेतील जाचक अटी आणि ई.व्ही.एम. (EVM) प्रणालीतील त्रुटींवर आक्षेप घेत महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

निवेदनात जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण अपुरे राहिल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांवरील संकट ओळखून शासनाने जिल्ह्याला तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करावे आणि शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपयांची भरीव मदत द्यावी. देशात चुकीच्या व जाचक अटी टाकून मतदार यादीची एस.आय.आर. प्रक्रिया राबविण्यात आली असून, ती तात्काळ रद्द करून सुरक्षित करण्यात यावी आणि मतदारांना योग्य न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

तसेच निवडणूक आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी चुकीच्या पद्धतीने संपूर्ण प्रक्रिया राबवून दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. बऱ्याच निवडणुकांमध्ये ई.व्ही.एम. मशिनमध्ये काही ठिकाणी बिघाड होणे किंवा मतांची आकडेवारी अचूक नसणे यांसारख्या कारणांमुळे लोकशाही मार्गाने निवडणुका होत नसल्याचा दावा करत, ई.व्ही.एम. ऐवजी पुन्हा बॅलेट पेपरवर (पुरातन कागदी मतदान पद्धत) निवडणुका घेण्यात याव्यात, या मागणी करण्यात आली आहे.

या सर्व मागण्या शासनाने त्वरित मान्य कराव्यात, अन्यथा आगामी काळात महाविकास आघाडीच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. या निवेदनावर महाविकास आघाडीतील विविध प्रमुख पक्षांचे पदाधिकारी व नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here