म्हैसाळचे पाणी मंगळवेढ्याच्या शेवटच्या गावांपर्यंत पोहोचवा – आमदार समाधान आवताडे

म्हैसाळ

चार साठवण तलाव बंदिस्त पाइपलाइनद्वारे भरण्याची आमदार समाधान आवताडे यांची मागणी; कृष्णा-भीमा नदीजोडीतून ६ टीएमसी पाण्याचीही मागणी

पंढरपूर (तालुका रिपोर्टर प्रकाश इंगोले) | मंगळवेढा तालुक्यातील म्हैसाळ उपसा सिंचन प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील गावांना पुरेशा दाबाने व नियमित पाणी मिळावे, यासाठी शिरनांदगी, पडोळकरवाडी, मारोळी व लवंगी येथील साठवण तलाव मुख्य कालव्यावरून थेट बंदिस्त पाइपलाइनद्वारे भरून देण्याची आक्रमक मागणी आमदार समाधान आवताडे यांनी केली आहे.

 

राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडलेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत त्यांनी मतदारसंघातील विविध सिंचन योजनांबाबत सविस्तर चर्चा केली. या महत्त्वपूर्ण बैठकीस जलसंपदा विभागाचे सचिव एकनाथ डवले, अलका अहिरराव, मुख्य अभियंता संजीव चोपडे यांच्यासह विभागाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पाणी वितरणातील अडचणी आणि प्रमुख मागण्या:

  • शेवटच्या टप्प्यातील गावांना पाण्याचा प्रश्न: म्हैसाळ योजनेतील पाणी वितरणाच्या शेवटच्या टप्प्यातील गावांना अत्यल्प प्रमाणात व कमी दाबाने पाणी मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यावर तोडगा म्हणून मंगळवेढा तालुक्यातील गावे तसेच पडोळकरवाडी, लवंगी, मारोळी व शिरनांदगी हे चार मोठे साठवण तलाव बंदिस्त पाइपलाइनद्वारे भरण्यासाठीच्या सुधारित प्रस्तावास तातडीने मंजुरी देण्याची मागणी करण्यात आली.
  • वितरिका व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न: म्हैसाळ योजनेच्या वितरिका क्रमांक १ व २ तसेच उमदी डीवायवरील मंगळवेढा तालुक्यातील काही गावे अद्याप पाण्यापासून वंचित आहेत. या भागातील शेतीसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनल्याने तात्काळ पाणी सोडण्याची मागणी यावेळी रेटण्यात आली.
  • कृष्णा-भीमा नदीजोडीतून ६ टीएमसी पाणी: कृष्णा-भीमा नदीजोड प्रकल्पांतर्गत कृष्णा नदीतील अतिरिक्त वाहून जाणारे ५० टीएमसी पाणी उजनी धरणात वळविण्याचा प्रस्ताव असून, यातील सुमारे ६ टीएमसी पाणी माण नदीच्या माध्यमातून मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी भागाला उपलब्ध करून द्यावे, अशी ठळक मागणी यावेळी करण्यात आली. यावर जलसंपदा मंत्री विखे-पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेत शासनस्तरावर योग्य निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत.

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ वेळेत मिळावा, यासाठी प्रलंबित कामांचे सूक्ष्म नियोजन करून ती कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच कालव्यांची गळती रोखणे, बंधारे भरून घेणे आणि उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी आवश्यक कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

आमदार समाधान आवताडे यांनी बैठकीत म्हैसाळ उपसा सिंचन योजना फेज १ व २ नाबार्डमध्ये समाविष्ट करून निधी उपलब्ध करावा. म्हैसाळ फेज ३ ची निविदा प्रक्रिया तातडीने राबवावी. भीमा नदीवरील बंधाऱ्यांची उंची वाढविण्यास प्रशासकीय मंजुरी द्यावी. डोंगरगाव-खडकी मार्गावरील उजनी कॅनलच्या पुलास प्रशासकीय मान्यता देण्यात यावी. नीरा-भाटघर कालव्यावरील नादुरुस्त गेटच्या दुरुस्तीसाठी तातडीने निधी द्यावा. गुंजेगाव येथे नवीन बंधारा बांधण्यात यावा या मागण्या करण्यात आल्या आहेत.

या सर्व मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली असून, लवकरच यावर ठोस तोडगा निघेल व रखडलेल्या प्रकल्पांना गती मिळेल, असा ठाम विश्वास आमदार समाधान आवताडे यांनी व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here