सातारा (जिल्हा क्राइम रिपोर्टर संजय भोसले) | ग्रामरोजगार सहाय्यकांचे प्रलंबित मानधन, शासन निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी तसेच त्यांच्यावर लादण्यात आलेल्या अन्यायकारक व जाचक अटी रद्द करण्यात याव्या, या प्रमुख मागण्यांसाठी ग्रामरोजगार सहाय्यक संघटना, वाई तालुका यांच्या वतीने दि. ५ ऑक्टोबर २०२६ पासून काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संघटनेच्या वतीने वाई पंचायत समिती येथे जाऊन गटविकास अधिकारी श्री. घोलप साहेब यांना विविध मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनात दि. ३ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार ग्रामरोजगार सहाय्यकांना ८,००० रुपये मानधन आणि २,००० रुपये प्रवास भत्ता, असा एकूण १०,००० रुपयांचा मासिक लाभ तातडीने लागू करण्यात यावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे, मागील दोन वर्षांपासून प्रलंबित असलेले मानधन संबंधित रोजगार सेवकांच्या बँक खात्यावर विनाविलंब जमा करावे, जेणेकरून त्यांच्या आर्थिक अडचणी दूर होऊ शकतील., ग्रामरोजगार सहाय्यकांवर लादण्यात आलेल्या अन्यायकारक व जाचक अटी तातडीने रद्द करण्यात याव्यात आणि वाढत्या कामाच्या व्यापानुसार त्यांना आवश्यक त्या प्रशासकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
सध्या सणासुदीचे दिवस जवळ आले असताना, गेल्या अनेक महिन्यांपासून मानधन न मिळाल्यामुळे ग्रामरोजगार सहाय्यकांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाच्या ठरलेल्या नियमानुसार व जीआरनुसार सहाय्यकांना हक्काची मिळणारी रक्कम वेळेवर मिळावी, हीच त्यांची मुख्य मागणी आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.







