मुंबई (संपादक सुनिल पाटील) । स्वातंत्र्यसेनानी, घटना समितीचे सदस्य, देशभक्त पद्मश्री डॉ. रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या ११७ व्या जयंती महोत्सवाचे औचित्य साधून मुंबईत भव्य ‘लोकसेवा पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. देशभक्त पद्मश्री डॉ. रत्नाप्पाण्णा कुंभार जयंती उत्सव समिती, मुंबई (महाराष्ट्र) यांच्या वतीने दादर-माटुंगा कल्चरल सेंटर, माटुंगा (प.) येथे हा गौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या सोहळ्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ‘कुंभार समाज सामाजिक संस्था’ महाराष्ट्र प्रदेशचे संस्थापक अध्यक्ष अतिशशेठ देवरे यांनी भूषविले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी केंद्रीय मंत्री भगवंत खुबा उपस्थित होते. तसेच अखिल भारतीय प्रजापती महासंघाचे राष्ट्रीय संयोजक आर. बी. के. प्रजापती यांनी स्वागताध्यक्षपदाची धुरा सांभाळली.
कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून दादरचे आमदार महेश सावंत, चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील तसेच विधान परिषदेचे आमदार व माजी राज्यमंत्री बसवराज पाटील उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या भाषणात डॉ. रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील आणि सहकार क्षेत्रातील अतुलनीय योगदानाचा गौरव करत, त्यांचे विचार आणि मूल्ये आजही समाजाला दिशा देणारी असल्याचे प्रतिपादन केले.
या सोहळ्यात समाजसेवा, शिक्षण व जनसेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना ‘लोकसेवा पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. समाजात एकता निर्माण करणे, शिक्षणाचा प्रसार करणे आणि सामाजिक जागृती वाढवणे हाच डॉ. कुंभार यांच्या विचारांचा खरा वारसा असून, तो पुढे नेण्याचा संकल्प या वेळी व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी रत्नाप्पा कुंभार प्रतिष्ठानच्या अध्यक्षा रजनीताई मगदूम, रत्नाप्पा कुंभार सेवा संघाचे संस्थापक संजीव प्रजापती, विधानसभा उपाध्यक्षांचे ओएसडी श्रीकांत पंडित, प्रजापती कुंभार महासंघाचे राजकीय संघटक मल्लिकार्जुन कुंभार, भारतीय समता समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाबा प्रजापती, उत्तर प्रदेश पत्रकार युनियनचे अध्यक्ष अमन विश्वकर्मा, पत्रकार निलेश प्रजापती, ओमप्रकाश प्रजापती, रमेश प्रजापती यांच्यासह कुंभार व प्रजापती समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







