पर्यटकांसाठी खुशखबर! नेरळ-माथेरान ‘मिनी ट्रेन’ उद्यापासून पुन्हा रुळावर; मध्य रेल्वेकडून वेळापत्रक जाहीर

नेरळ-माथेरान 'मिनी ट्रेन'

मुंबई (संपादक सुनिल पाटील) | निसर्गरम्य डोंगररांगा आणि हिरवाईचा आनंद घेत माथेरानच्या थंड हवेच्या ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. पावसाळ्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेली प्रसिद्ध नेरळ-माथेरान मिनी ट्रेन सेवा उद्या, ३० ऑक्टोबरपासून पूर्ववत सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या मार्गावरील फेऱ्यांचे अधिकृत वेळापत्रकही रेल्वे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे.

 

पावसाळ्याच्या दिवसांत दरडी कोसळणे आणि सुरक्षिततेचा धोका लक्षात घेऊन दरवर्षी जून ते ऑक्टोबर या कालावधीत नेरळ ते माथेरान दरम्यानची मुख्य मिनी ट्रेन सेवा खबरदारीचा उपाय म्हणून बंद ठेवली जाते. आता पावसाळा संपल्याने ही बहुप्रतिक्षित सेवा पुन्हा सुरू होत असून, पर्यटकांना घाटातील नागमोडी वळणांवरून प्रवासाचा आनंद लुटता येणार आहे. नेरळ-माथेरान दरम्यान दररोज दोन नियमित फेऱ्या चालवण्यात येणार असून, पर्यटकांच्या सोयीसाठी अमन लॉज ते माथेरान दरम्यानची शटल सेवाही सुरू राहणार आहे.

नेरळ ते माथेरान (जाताना): गाडी क्र. ५२१०३: नेरळ येथून सकाळी ८:५० वाजता सुटेल आणि सकाळी ११:३० वाजता माथेरानला पोहोचेल. गाडी क्र. ५२१०५: नेरळ येथून सकाळी १०:२५ वाजता सुटेल आणि दुपारी १:०५ वाजता माथेरानला पोहोचेल.

माथेरान ते नेरळ (परतीचा प्रवास): गाडी क्र. ५२१०४: माथेरान येथून दुपारी २:४५ वाजता सुटेल आणि सायंकाळी ५:३० वाजता नेरळला पोहोचेल. गाडी क्र. ५२१०६: माथेरान येथून सायंकाळी ४:०० वाजता सुटेल आणि सायंकाळी ६:४० वाजता नेरळला पोहोचेल.

दिवाळीच्या सुट्ट्या आणि पर्यटनाचा हंगाम तोंडावर असतानाच मिनी ट्रेन सुरू होत असल्याने माथेरानमधील स्थानिक व्यावसायिक, हॉटेलचालक आणि पर्यटकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here