‘आमने सामने’ नाटकातील वाद चिघळला; अभिनेता रोहन गुजर, केतकी पालवचे निर्मात्यांना प्रत्युत्तर

आमने सामने

मुंबई (संपादक सुनिल पाटील) | मराठी रंगभूमीवर गाजणाऱ्या ‘आमने सामने’ या नाटकातील कलाकार आणि निर्मात्यांमधील वाद दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना दिसत आहे. अभिनेता रोहन गुजर आणि अभिनेत्री केतकी पालव यांना अचानक नाटकातून काढल्याचा आरोप झाल्यानंतर निर्माते लीना भागवत व मंगेश कदम यांनी व्हिडिओ जारी करत कलाकारांनी तिसऱ्यांदा मानधनवाढ मागितल्याचा दावा केला होता. यावर आता रोहन आणि केतकी यांनी सोशल मीडियावर नवा व्हिडिओ शेअर करून सडेतोड उत्तर दिले असून, “आमच्या बाजूने पूर्णविराम” असे म्हणत संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे.

 

निर्मात्यांच्या दाव्यांचे खंडन करताना रोहन आणि केतकी म्हणाले की, “निर्मात्यांनी तीन वेळा मानधनवाढ झाल्याचे ठामपणे सांगितले, मात्र ही वाढ एका वर्षात नाही तर तब्बल आठ वर्षांत झाल्याचे सोयीस्कररीत्या लपवले. सरासरी पाहिली तर अडीच ते पावणेतीन वर्षांनंतर एकदा मानधनवाढ झाली आहे. पहिली वाढ चार वर्षांनंतर अत्यंत किरकोळ स्वरूपात झाली होती, हे स्वतः निर्मात्यांनीही मान्य केले होते. दुसरी वाढ सहा वर्षांनंतर झाली. तिसरी मानधनवाढ आम्ही आता एका वर्षानंतर मागत होतो. सात-आठ वर्षांत नाटक हाऊसफुल चालूनही निर्मात्यांनी स्वतःहून कधी मानधन वाढवून देण्याचा पुढाकार घेतला नाही.”

नाटकाप्रती आपली निष्ठा स्पष्ट करताना कलाकारांनी सांगितले की, कोरोनाच्या काळात जेव्हा ५० टक्के प्रेक्षकक्षमतेची मर्यादा होती, तेव्हा निर्मात्यांच्या विनंतीवरून आम्ही निम्म्या मानधनावर काम करण्यास तत्काळ तयार झालो होतो. तसेच भविष्यात नाटकाचे बुकिंग कमी झाले तर पुन्हा मानधन कमी करून घेण्याचीही आमची तयारी होती.

गेल्या सात वर्षांहून अधिक काळ एका कुटुंबाप्रमाणे नाटकासाठी प्रामाणिकपणे काम केल्यानंतर, मानधनातील केवळ दीड हजार रुपयांच्या फरकावरून तडकाफडकी रिप्लेस करण्यात आल्याचे दुःख झाल्याची खंत अभिनेता रोहन गुजरने भावुक होत व्यक्त केली. कलाकारांच्या या नव्या स्पष्टीकरणानंतर सोशल मीडिया आणि नाट्यवर्तुळात या वादावर उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here