स्पेनमध्ये दोन हायस्पीड रेल्वे गाड्यांची समोरासमोर भीषण धडक; ६४ प्रवाशांचा मृत्यू

हायस्पीड रेल्वे गाड्यांची

माद्रिद (वृत्तसंस्था) | स्पेनमध्ये दोन हायस्पीड रेल्वे गाड्यांमध्ये झालेल्या भीषण अपघातात किमान ६४ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या काळीज पिळवटून टाकणाऱ्या दुर्घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. रेल्वे मार्गावरील स्वयंचलित सुरक्षा यंत्रणेत बिघाड झाल्यानंतर नियंत्रण कक्षाने घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. स्पेनचे परिवहन मंत्री ऑस्कर पुएन्ते यांनी या प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेत सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

 

रेल्वेचा वेग, अचूक स्थान आणि दोन गाड्यांमधील सुरक्षित अंतर नियंत्रित करणारी स्वयंचलित सिग्नल सुरक्षा यंत्रणा अचानक बंद पडली. ही संगणकीय प्रणाली ठप्प झाल्याने मार्गावरील हायस्पीड गाड्या जागेवरच थांबल्या. त्यामुळे तात्काळ गाड्यांचे मॅन्युअल संचालन आणि नियंत्रण कक्षामार्फत व्यवस्थापन सुरू करण्यात आले.

यंत्रणेत बिघाड झालेला असतानाच नियंत्रण कक्षाकडून एका हायस्पीड ट्रेनला पुढे जाण्यासाठी हिरवा कंदील दाखवण्यात आला. मात्र, दुर्दैवाने त्याच ट्रॅकवर आधीच दुसरी गाडी उभी होती. नियंत्रण कक्षाच्या या संशयास्पद सूचनेनंतर दोन्ही अतिवेगवान गाड्यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. तांत्रिक बिघाडासोबतच मानवी हलगर्जीपणामुळे एवढा मोठा अनर्थ घडला का, याचा शोध आता तपास यंत्रणा घेत आहेत.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक बचाव पथकांनी युद्धपातळीवर मदतकार्य राबवून जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयांत दाखल केले. मृतांची ओळख पटवण्याचे काम वेगाने सुरू आहे. रेल्वेचा ब्लॅक बॉक्स, घटना घडली त्यावेळची सिग्नल यंत्रणेची स्थिती आणि नियंत्रण कक्षातील संभाषणाचे रेकॉर्डिंग फॉरेन्सिक पथकाकडून तपासले जात आहे. तांत्रिक बिघाडानंतर नियंत्रण कक्षातून नेमके कोणते निर्देश दिले गेले, हे तपासाअंती स्पष्ट होईल असे परिवहन मंत्र्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here