सौदी अरेबियात क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ले; रियाधसह दोन विमानतळ बंद

सौदी अरेबियात

रियाध (वृत्तसंस्था) । सौदी अरेबियाची राजधानी रियाधसह प्रमुख शहरांमध्ये हुती बंडखोरांनी केलेल्या तीव्र क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांमुळे खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात विमानतळांच्या परिसराला लक्ष्य करण्यात आल्याने मोठा धूर निघताना दिसला असून सुरक्षेच्या कारणास्तव महत्त्वाचे विमानतळ तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. या भीषण परिस्थितीचा फटका दिल्लीहून रियाधला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानालाही बसला असून, वैमानिकांनी प्रसंगावधान राखत विमान सुरक्षितरीत्या दिल्लीकडे परत वळवले.

सौदी अरेबियातील अत्यंत महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या दोन आंतरराष्ट्रीय विमानतळांवर हे हल्ले झाले आहेत. यामध्ये रियाध येथील ‘किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळ’ आणि ‘अभा आंतरराष्ट्रीय विमानतळ’ यांचा समावेश आहे.

सौदी अधिकाऱ्यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, या हल्ल्यांमध्ये एकूण ३ जणांचा मृत्यू झाला असून ३६ जण गंभीर जखमी झाले आहेत: रियाध (किंग खालिद विमानतळ) या हल्ल्यात १ व्यक्तीचा मृत्यू झाला तर ८ जण जखमी झाले. अभा विमानतळ या ठिकाणी झालेल्या हल्ल्यात २ जण बळी पडले असून २८ जण जखमी झाले आहेत.

या हल्ल्यांची जबाबदारी येमेनमधील इराण-समर्थित हुती बंडखोरांनी स्वीकारली असून, सौदीच्या लष्करी कारवायांच्या प्रत्युत्तरात हे हल्ले केल्याचे त्यांच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.

दिल्लीहून रियाधच्या दिशेने निघालेले एअर इंडियाचे AI2243 हे विमान भारताच्या हवाई हद्दीतून आणि अरबी समुद्रावरून सौदी अरेबियाच्या मार्गावर होते. मात्र, प्रवासादरम्यान सौदी अरेबियातील विमानतळांवर क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ले झाल्याची आणि रियाधचे आकाश असुरक्षित बनल्याची आपत्कालीन माहिती वैमानिकांना मिळाली. प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत वैमानिकांनी तातडीने निर्णय घेतला आणि विमानाचा मार्ग बदलत ते दिल्लीकडे परत आणले. हे विमान सुरक्षितपणे दिल्लीत उतरले असून मोठा अनर्थ टळला.

या हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या युद्धासारख्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे एअर इंडिया आणि इंडिगोसह प्रमुख विमान कंपन्यांनी १० ऑक्टोबरपर्यंत रियाधला जाणारी आपली सर्व उड्डाणे तात्पुरती स्थगित केली आहेत. तसेच रद्द झालेल्या विमानांच्या प्रवाशांना पूर्ण परतावा  दिला जाईल, असे जाहीर करण्यात आले आहे.

दुसरीकडे, रियाधमधील भारतीय दूतावासाने सौदी अरेबियात असणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाची सुरक्षा ॲड्व्हायझरी जारी केली आहे. भारतीय नागरिकांना अत्यंत सतर्क राहण्याचे, गरजेशिवाय घराबाहेर न पडण्याचे आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भारताने या हल्ल्याचा तीव्र निषेध करत नागरी वस्त्या आणि विमानतळांसारख्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे पूर्णपणे निषेधार्य असल्याचे म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here