बँकॉक (वृत्तसंस्था) | जगभरातील पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असलेल्या थायलंडमधील प्रसिद्ध फुकेत बेटावर सोमवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत ११ जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर ३६ जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
फुकेत बेटावरील पोटांग येथील ‘फांग मुआंग साई कोर’ रोडवर सोमवारी पहाटे ३ वाजून १७ मिनिटांनी ही दुर्घटना घडली. येथे वाहन भाड्याने देणारा व्यवसाय आणि विक्री कार्यालये असलेल्या एका व्यावसायिक इमारतीला सुरुवातीला आग लागली. काही क्षणांतच या आगीने रौद्ररूप धारण केले आणि ती आजूबाजूच्या इतर इमारतींमध्येही पसरली.
पोटांग नगरपालिकेचे उपमहापौर सानाकोर्न किसीन यांनी स्थानिक माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, संबंधित इमारतीच्या तळमजल्यावर सुमारे १०० मोटरसायकली उभ्या होत्या. या दुचाकींमधील पेट्रोल, रबराचे टायर आणि प्लॅस्टिकच्या भागांमुळे आगीने क्षणात पेट घेतला. ज्वलनशील पदार्थांमुळे आगीचा मोठा भडका उडाला आणि संपूर्ण इमारत आगीच्या विळख्यात सापडली.
आग लागल्याचे लक्षात येताच जीव वाचवण्यासाठी इमारतीतील काही नागरिक वरच्या मजल्यावर धावले. मात्र, सर्वत्र पसरलेल्या दाट धुरामुळे त्यांना बाहेर पडणे कठीण झाले आणि यातच गुदमरून व होरपळून ११ जणांचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. आगीची तीव्रता आणि धुराचे लोट यामुळे जवानांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अखेर दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आल्याचे पोलिसांनी सांगितले.







