राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे जननायक बिरसा मुंडा यांना अभिवादन

बिरसा मुंडा

जळगाव (संपादक सुनिल पाटील) | आदिवासी समाजाचे जननायक क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांची १५१ वी जयंती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) जळगाव महानगर जिल्हा शाखेच्या वतीने आकाशवाणी चौकातील जिल्हा कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. रविवारी (दि. १५) महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी आणि सामाजिक न्याय विभागाचे प्रमुख रमेश बारे यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

 

यावेळी जिल्हा कार्यालय सरचिटणीस वाय. एस. महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, “ब्रिटिश राजवटीत आदिवासी समाजाला एकत्र करून बिरसा मुंडा यांनी जल, जंगल आणि जमिनीच्या हक्कासाठी मोठा संघर्ष उभारला. जमीनदार आणि सावकारांच्या शोषणाविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. १८९९ ते १९०० या काळात झालेल्या ऐतिहासिक ‘उलगुलान’ आंदोलनाचे त्यांनी यशस्वी नेतृत्व केले. समाजात शिक्षण, एकता आणि स्वाभिमान जागवतानाच अंधश्रद्धा व वाईट प्रथा दूर करण्यावर त्यांनी भर दिला. ९ जून १९०० रोजी कारागृहात त्यांचे निधन झाले असले तरी, आजही ते सर्वांसाठी प्रेरणास्थान आहेत. १५ नोव्हेंबर हा दिवस ‘जनजातीय गौरव दिवस’ म्हणून साजरा केला जातो, ही त्यांच्या कार्याची मोठी पोचपावती आहे.”

या कार्यक्रमाप्रसंगी महानगर कार्याध्यक्ष राजूभाऊ मोरे, महानगर उपाध्यक्ष ललितभाऊ नारखेडे, गणेशभाऊ पाटील, अमोलभाऊ कोल्हे, किरणभाऊ राजपूत, सरचिटणीस सुहासभाऊ चौधरी, आकाशभाऊ हिवाळे, राष्ट्रवादी युवक महानगर उपाध्यक्ष रफीकभाई, भल्लाभाई तडवी पटेल, राजूभाऊ बाविस्कर, प्रदीपभाऊ ढगे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार महानगर जिल्हा कार्यालय सरचिटणीस सुनीलभैय्या माळी यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here